
तरुणीला पळवून आणल्याच्या संशयावरून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याची घटना संगमनेर शहरालगतच्या एका कॅफेमध्ये घडली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी आठ तरुणांना अटक केली आहे.
मफाज मतीनखान पठाण (वय 19, रा. कोल्हेवाडी रोड), सचिनकुमार महंतो अशी जखमींची नावे आहेत. संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजित अंकुश भरते (वय 24, दोघे रा. कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा. अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा. घुलेवाडी), करण संपत गलांडे (वय 21, रा. अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा. गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा. अकोले नाका), विश्वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा. नेहरू चौक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मालदाड रोडवरील डिलाईट कॅफे सेंटरमध्ये एक तरुणी सचिनकुमार महंतो या मित्रासोबत बसलेली होती. काही वेळाने मफाज पठाण तेथे आला. त्यानंतर त्यांच्यात तेथेच गप्पा रंगल्या. हा सर्व प्रकार पाहून काहींना वेगळाच संशय आल्याने त्यांनी आपल्या इतर मित्रांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. जमलेल्या टोळक्याने दोघा तरुणांना बळजबरीने सुकेवाडी-खांजापूर शिवारातील विठ्ठलकडा परिसरात नेऊन मारहाण केली.
घटना घडल्यानंतर मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये गोळा झाला. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांवर दरोडा आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करून आठ जणांना अटक केली आहे.































































