संघर्ष समितीचे तुणतुणे पुन्हा सुरू, 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील वादग्रस्त 27 गावांमध्ये विविध प्रकारच्या सुविधा  तसेच योजना राबवल्या जात असतानाच आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात संघर्ष समितीने ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’ असे म्हणत पुन्हा तुणतुणे सुरू केले आहे. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका तयार करा. या मागणीसाठी रविवार 7 एप्रिल रोजी मानपाडेश्वर मंदिराजवळ संघर्ष समितीची बैठक होणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सागाव, नांदिवली, भोपर, खोणी, काटई, दावडी आदी विविध 27 गावांचा प्रश्न चर्चेमध्ये आहे. 2014 साली निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतून  ही गावे वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. हे प्रकरण पुढे कोर्टात गेले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने 27 गावे पुन्हा महापालिकेत आली.

27 गावांपैकी अनेक गावांमध्ये महापालिकेने विकासकामे सुरू केली. दहा गावांवर लादण्यात आलेले ग्रोथ सेंटर रद्द करावे, दफ्तर नोंदणी तसेच एमएमआरडीएची दादागिरी या मुद्दय़ांवर संघर्ष समितीच्या  तीक्र भावना असून स्वतंत्र नगरपालिका तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात संघर्ष समितीने पुन्हा डोके वर काढल्याने डोंबिवलीतील राजकारण ढवळून निघाले आहे.

लोकांना विश्वासात घेणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून 27 गावे वगळावीत ही आमची मागणी आहेच. पण त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतले जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा की नाही यावरही या बैठकीत विचार होणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांनी सांगितले.