सांगलीकरांना सप्टेंबरपासून पाणी बिलाचे वाटपच नाही, घरपट्टीकराच्या वसुलीचे 38 टक्के उद्दिष्ट पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली महापालिकेचे आर्थिक उत्पन्न हे घरपट्टी व पाणीपट्टीवर अवलंबून आहे. या दोन्ही विभागांची वसुली मार्चमध्ये जोरदार असते. त्यावर महापालिकेचा आर्थिक ताळेबंद ठरतो. मात्र, सप्टेंबर 2021पासून नागरिकांना अद्यापि पाणी बिलाचे वाटप झाले नाही. त्यामुळे मार्चमध्ये होणाऱ्या वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरपट्टी व उपयोगकर्ता कराची या आर्थिक वर्षात 43 कोटींची वसुली झाली आहे. अर्थसंकल्पात दिलेल्या उद्दिष्टापैकी 38 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

महापालिकेचा आर्थिक गाडा घरपट्टी व पाणीपट्टी विभागाकडून चालविला जातो. त्यानुसार दोन्ही विभागांना अर्थसंकल्पात वसुलीचे टार्गेट दिले जाते. मात्र, यावर्षी अद्याप नागरिकांना पाणी बिलाचे वाटप झालेले नाही. सप्टेंबर 2021 पासून नळ कनेक्शनधारकांना पाणी बिले मिळाली नाहीत. मार्च महिना संपायला केवळ आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात नळ कनेक्शनधारकांना पाणी बिले देऊन वसुली करण्याचे मोठे आव्हान पाणीपुरवठा विभागाला असणार आहे. दुसरीकडे महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून घरपट्टी, उपयोगकर्ता कराचे 43 कोटी वसूल झाले आहेत.

घरपट्टीची 94 कोटींची थकबाकी

महापालिका क्षेत्रात सन 2021-22 या आर्थिक वर्षात मिळकतींची संख्या 1 लाख 42 हजार 283 इतकी आहे. आजअखेर घरपट्टीची एकूण थकबाकी 49 कोटी 54 लाख व चालू मागणी 44 कोटी 43 लाख अशी एकूण 93 कोटी 97 लाख इतकी आहे. उपयोगकर्ता कराचे थकीत 8 कोटी व चालू मागणी 9 कोटी 87 लाख रुपये आहे. त्यापैकी 6 कोटी 50 लाख रुपये वसूल झाले आहेत. ‘मार्च एण्ड’जवळ आल्याने महापालिकेने वसुलीसाठी मोहीम सुरू केलेली आहे. घरपट्टीसाठी कोणतीही अभय योजना नसताना कर्मचाऱ्यांनी दैनंदिन फिरती करून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम प्रगतिपथावर ठेवले आहे. 31 मार्च 2022 अखेर जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न चालू आहेत.

‘वॉरंट ऑफिसर’ची नियुक्ती

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ‘वॉरंट ऑफिसर’ नियुक्त केले आहेत. थकबाकीदारांच्या वसुलीसाठी पाणी कनेक्शन बंदची मोहीम सुरू आहे. आजअखेर 19 ग्राहकांचे पाणी कनेक्शन बंद केले आहे. जप्तीसाठी पथक गेले असता, मोठय़ा प्रमाणावर वसुली होत आहे. 31 मार्च 2022 अखेर थकबाकीवर व्याज, दंड, शास्तीमध्ये 25 टक्के सवलत दिली जात आहे. ही सवलत एप्रिल 2022 नंतर दिली जाणार नाही.

दिवसात 33 लाखांची घरपट्टी वसूल

महापालिकेच्या घरपट्टी विभागाने मंगळवारी एका दिवसात 32 लाखांची वसुली केली. यामध्ये रोख भरणा 21 लाख 30 हजार 441, तर 11 लाख 91 हजार 829 रुपयांचे धनादेश आहेत. असे एकूण 33 लाख 22 हजार 270 रुपये वसूल झाले आहेत. यात सांगली शहरात 19 लाख 25 हजार 448 रुपये, मिरज शहरात 10 लाख 76 हजार 155, तर कुपवाड शहरात 3 लाख 20 हजार 697 रुपये घरपट्टी वसुली झाली आहे.