
सांगलीवाडी परिसरातील बंद घरामध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. रघुनाथ सदाशिव शिंदे (वय 55, रा. सांगलीवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते घरात एकटेच होते.
रघुनाथ शिंदे यांच्या घरातील नातेवाईक एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे शिंदे हे घरात एकटेच राहत होते. यादरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा नातेवाईकांशी किंवा शेजाऱयांशी कोणताही संपर्क झाला नव्हता. आज सकाळी शिंदे यांच्या बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. नागरिकांनी या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याला दिली. सांगली शहर पोलिसांसह ‘स्पेशल रेस्क्यू फोर्स’च्या आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाचे कमांडर कैलास वडार, सागर जाधव, महेश गव्हाणे, असिफ मकानदार, इर्शाद कवठेकर आणि सदाशिव पेडेकर यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली. अत्यंत बिकट अवस्थेत असलेला मृतदेह पथकाने काळजीपूर्वक बाहेर काढून त्याचे पॅकिंग केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठविण्यात आला आहे.


























































