
बैलगाडा शर्यतींच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाने आयोजकांशी चर्चा करूनही आयोजक ठाम असल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत या शर्यती होणार नाहीत, याची सर्व दक्षता घेतली जात आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील व आजूबाजूच्या परिसरातील बैलगाडी चालक-मालक या शर्यतींत सामील होण्यासाठी येण्याची शक्यता असल्याने मोठय़ा प्रमाणावर गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही उल्लंघन होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील मौजे झरे, पिंपरी बुद्रूक, विभूतवाडी, कुरुंदवाडी, पडळकरवाडी, निंबवडे, घाणंद, जांभुळणी, घरनिकी या नऊ गावांच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 20) मध्यरात्रीपर्यंत अत्यावश्यक बाबी वगळता संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील आठवडे बाजारांना परवानगी
जिल्ह्यात गुरुवारपासून (दि. 19) आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, सांगली शहरातील सर्व आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी जनसेवा भाजीपाला संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून सांगली आणि कुपवाडच्या उपनगरांमध्ये भाजीपाला विक्री पूर्णतः बंद केली होती. या बंदला भाजीपाला विक्रेत्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला असल्याचा दावा जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केला आहे.

























































