
जिल्हा बँकेसाठी आज अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, खासदार संजयकाका पाटील, आमदार मोहनराव कदम, विक्रमसिंह सावंत, मानसिंगराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, दिनकर पाटील, जयश्री मदन पाटील, अनिता सगरे या दिग्गजांसह जिह्यातील 204 जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत 253 अर्ज झाले आहेत. बहुतांश अर्जामध्ये विद्यमान उमेदवारांचा समावेश आहे. उद्या (दि. 22) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होत आहे. निवडणुकीसाठी गेल्या चार दिवसांपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज चौथ्या दिवशी जिह्यातील 204 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल केलेल्यांमध्ये खासदार, आमदार, माजी आमदारांसह दिग्गजांचा समावेश आहे. बँकेचे विद्यमान संचालक सी. बी. पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत हाक्के, सिकंदर जमादार, माजी अध्यक्ष डी. के. पाटील, माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, शशिकांत देठे, किरण लाड, चिमण डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, रवींद्र बर्डे, सांगलीच्या माजी महापौर संगीता खोत, राहुल महाडिक, वैभव शिंदे, सत्यजित देशमुख, सत्यजित नाईक, तम्मणगौडा रवी पाटील, तानाजी यमगर, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, मीनाक्षी अक्की, मालन मोहिते, सी. आर. सांगलीकर, चन्नाप्पा होर्तीकर यांच्यासह अनेकांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (दि. 22) शेवटचा दिवस असल्यामुळे मोठय़ा संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
सोमवार (दि. 25) उमेदवारी अर्जांची छाननी होईल. जिल्हा बँकेसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची दमछाक होणार आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर जिह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

























































