
चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठय़ात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणाचा पाणीसाठा 29.03 टीएमसी झाला असून, सलग दुसऱ्या दिवशी 4500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 19 फुटांकडे वाटचाल करू लागली आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती, तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासात 64 मि.मी. पाऊस झाला. धरणात सायंकाळी 29.03 टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले असून 4500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. धरणात 69.05 टीएमसी पाणीसाठा झाला असून, 1050 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 19 फुटांकडे वाटचाल करू लागली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 88.25 टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक 1 लाख 10 हजार क्युसेकने होत असून 1 लाख 11 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.6 मि.मी. पाऊस झाला.