आदित्य ठाकरे यांचे जादुई पत्र, 400 वर्षांचा निसर्ग ठेवा वाचला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा सांगली जिल्ह्यातील भोसे येथील 400 वर्षांचा निसर्ग ठेवा असलेला महाकाय वटवृक्ष वाचविण्यात यश आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता नियोजित महामार्गात बदल करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले होते. या पत्राची दखल घेत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सव्र्हिस रोडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर या नियोजित राष्ट्रीय महामार्गच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पुरातन वटवृक्षावर कुऱ्हाड चालविण्यात येणार होती. भोसे ग्रामपंचायत, यल्लमा मंदिर देवस्थान ट्रस्ट, सह्याद्री देवराई निसर्गप्रेमींrसह परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. 400 वर्षांपूर्वींचा वटवृक्ष वाचवून त्याच्या बाजूने महामार्ग तयार करावा, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने अहवाल मागवून महार्गात बदल करण्याची विनंती केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्राद्वारे केली होती.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तातडीने याची दखल घेऊन वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाठवले. प्राधिकरणचे संचालक संजय कदम यांनी बुधवारी परिसरातील नागरिकांसह वटवृक्ष आणि महामार्गाच्या कामाची पाहणी केली. मुख्य महामार्गात वटवृक्षाचा अडथळा नाही. सव्र्हिस रोडमध्ये वटवृक्ष येत असल्याने तेथील काम स्थगित करून पर्यायी जागेचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वटवृक्ष वाचवण्याबाबतचा अहवाल लवकरच केंद्रीय मंत्र्यांना पाठवला जाईल,’ अशी माहिती संचालक कदम यांनी दिली.

वृक्षप्रेमींकडून आनंद साजरा

वटवृक्ष वाचविण्याच्या लढाईला यश आल्याने वृक्ष प्रेमींनी साखर वाटून आनंद साजरा केला. सांगली जिल्ह्यातील मोजे भोसे गावात यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे.