संगमेश्वर – डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

शनिवारी सकाळी आरवली राजीवली मार्गावर मुरडव येथे डंपर आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (वय 28) जागीच ठार झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार याचा चेंदामेंदा झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास मुरडव बाटेवाडीत राहणारे योगेश तुकाराम बाटे हा आरवलीहून मुरडवकडे आपली मोटारसायकल क्रमांक एमएच 04 डीएच 1983 ने चालला होता. मुरडव येथील छोट्याशा वळणावर येताच समोरून येणाऱ्या डंपर क्रमांक एमएच 04 सीयू 9663 आणि मोटारसायकल यांच्यात धडक झाली. मोटारसायकल चालक याची धडक डंपरच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाला आदळला. डंपरचे चाक योगेश बाटेच्या डोक्यावरून गेले. ही धडक एवढी मोठी होती की, मोटारसायकलस्वार योगेश बाटे जागीच ठार झाला.

भीषण धडकेमुळे योगेश बाटेच्या डोक्याला जबर दुखापत होऊन मेंदू बाहेर पडला तसेच शरीराचा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिवसेना विभागप्रमुख मनू शिंदे, आंबव पोलीस चेकपोस्टवरील पोलीस गणेश बिक्कड, पोलीस ग्रामस्थ संकेत भुवड, सुनील गंगारकर, तुकाराम मेणे, दिनेश परकर, मुकेश चव्हाण, धर्मा कोंडविलकर,आदी ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले व योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.

डॉ. प्रदीप शिंदे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या तांब्यात दिले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर 304 (अ), 279 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची खबर पोलीस पाटील राजा मेणे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या