
सामना प्रतिनिधी। संगमेश्वर
द हॅबिटाट ट्रस्ट, नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण संस्थेच्या कोकणातील खवले मांजर संरक्षण मोहिमेचा राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला. गुरुवारी 20 डिसेंबरला दिल्ली येथील किरण नदार म्युझियम ऑफ आर्ट सभागृहात भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा बनवणारे व प्रोजेक्ट टायगर चालू करणारे डॉ. एम. के. रणजितसिंह व द हॅबिटाट ट्रस्टची संस्थापक रोशनी नादार-मल्होत्रा यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष व IUCN SSC पँगोलिन स्पेशालीस्ट ग्रुप मेंबर भाऊ काटदरे व प्रकल्प प्रमुख अभिषेक सिंह यांना पुरस्कार देण्यात आला.
संपूर्ण भारतातून हॅबिटाट ट्रस्ट कडे एकूण ७०० अर्ज म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ग्रँट, लेसरनोन हॅबिटाट ग्रँट, लेसरनोन स्पिसिज ग्रँट या तिन्ही विभागातून प्रत्येकी ३०० पेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यापैकी संपूर्ण भारतातून लेसरनोन स्पिसिज ग्रँटसाठी पहिल्या क्रमांकाने सह्याद्री निसर्ग मित्रची निवड करण्यात आली.
सर्व ७०० अर्जांमधून प्रथम ३०० जणांना निवडण्यात आले. त्यातील परत प्रशासकीय बाबी तपासून तसेच प्रकल्पाचे महत्व तपासून अंतिम १५ जणांची निवड करण्यात आली. नंतर द हॅबिटाट ट्रस्ट कडून नंतर स्टेफी झेवियर व डॉ. ध्रुव मंकड यांनी प्रत्यक्ष फिल्डवर येऊन सर्व संस्थांचा प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली व लोकांजवळ बोलले. त्यातून नंतर अंतिम मुलाखतीसाठी ९ जणांची निवड करण्यात आली.
अंतिम स्पर्धकांना दिल्ली मध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. तेथे एका पॅनल समोर अर्ध्या तासाची मुलाखत झाली.
त्या मुलाखतीमध्ये पहिल्या गटात लेसरनोन स्पिसिज ग्रँट साठी सह्याद्री निसर्ग मित्र दुसऱ्या गटात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ग्रँट साठी फाउंडेशन ऑफ इकॉलोजीकल सिक्युरिटी (FES) आणि तिसऱ्या गटात लेसरनोन हॅबिटाट ग्रँट साठी रीफ वॉच मरीन कॉन्झरव्हेशन यांची निवड करण्यात आली.या सन्मानाबरोबरच द हॅबिटाट ट्रस्ट पुढील वर्षभर संस्थेच्या खवले मांजर संरक्षण मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करणार असून ट्रॅप कॅमेरे, जनजागृती, शालेय कार्यक्रम व आदिवासी लोकांना रोजगार यामध्ये आर्थिक मदत सुद्धा करणार आहे.
































































