
लॉकडाऊनचे साईड इफेक्ट्स आता दिसू लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद असल्याने ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने अर्धा पगार कापल्याच्या रागापोटी शेकडो मजूरांनी गुरूवारी सायंकाळी सांगोल्यातील जुनोनी येथे प्रचंड गोंधळ घातला. संतप्त मजूरांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात तीन पोलीस जखमी झाले.
सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मध्य प्रदेशातील सुमारे 500 मजूर जुनोनी येथे वास्तव्यास आहेत. कंपनीने अर्धा पगार कापल्याने या मजूरांनी व्यवस्थापक त्रिपाठी यांच्याशी हुज्जत घातली. त्रिपाठी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक फौजदार विलास कांबळे, लतीफ मुजावर आदींनी घटनास्थळी पोहोचून मजूरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मजूरांच्या जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. त्यात कांबळे यांच्यासह विजय थिटे, राजू चौगुले हे पोलीस जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी नऊ मजूरांवर गुन्हा दाखल केला आहे.

























































