संजय बर्वे ऍण्टी करप्शनच्या प्रमुखपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद असलेल्या ऍण्टी करप्शन ब्युरोला अखेर नवा पोलीस महासंचालक मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या ‘एसीबी’च्या महासंचालकपदी मुंबई पोलीस आयुक्तांच्या शर्यतीत असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची वर्णी लागली आहे.

अति महत्त्वाचे असलेले ऍण्टी करप्शन ब्युरोचे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून महासंचालकाविना सुरू होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे फणसाळकर हेच सर्व कामकाज पाहत होते. पण त्यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे बऱयाच महिन्यांपासून महासंचालकाविना कामकाज करणाऱया ऍण्टी करप्शन ब्युरोला प्रमुख कधी भेटणार, अशा प्रकारे अजून किती दिवस कामकाज चालणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. अखेर इतक्या महिन्यांनंतर ‘एसीबी’ला प्रमुख मिळाला. पोलीस महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे ‘एसीबी’ची धुरा आज अधिकृतरीत्या सोपविण्यात आली.