
>> संजय कऱ्हाडे
गोलंदाजांनो, शाबाश! सुंदर, अक्षर, वरुण, शिवम, अर्शदीप, बुमरा शाबाश! हिंदुस्थानी फलंदाजांनी जे सांडलं ते गोलंदाजांनी अलगद झेललं आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. वॉशिंग्टन आणि अक्षरने सुंदर गोलंदाजी केली. त्यांना शिवमने छान साथ दिली. अर्शदीप, बुमरा अन् वरुणही आपापल्या लौकिकाला जागले.
आपल्या फलंदाजीबद्दल मात्र असं म्हणता येणार नाही. 14 षटकांत दोन बाद एकशे एकवीस. आणि पुढच्या सहा षटकांत आणखी सहा बाद अन् फक्त सेहेचाळीस धावा! याच दरम्यान आपल्या कप्तानासह बाकीचे वीर धारातीर्थी पडले.
तिसरा सामना सोडला तर आपल्या फलंदाजांनी फारशी चमक दाखवलेली नाही. अभिषेकने फटकावलेल्या एका अर्धशतकाशिवाय त्यांनी आश्वासक अशी कामगिरी केलेली नाही. टी ट्वेंटी म्हणजे फलंदाजांचा सण. या सणात गोलंदाजांनी फक्त वातीसारखं जळायचं असतं आणि फलंदाजांनी फटाक्यांची आतिषबाजी करायची असते. पण आपल्या फलंदाजांनी बऱयाच अंशी गोलंदाजांना डोक्यावर बसवलं. कधी हाराकिरी करून तर कधी खेळपट्टय़ा, गोलंदाजांना योग्य सन्मान नाकारून.
प्रत्येक चेंडूला सरसावून पुढे जाणं अभिषेकने टाळलं पाहिजे. जर तो वनडे आणि कसोटी खेळण्याचे मांडे मनात खात असेल तर त्याने सवयी बदलणं जरुरी आहे. आज त्याचा एक विक्रमही हुकला. सर्वात जलदगतीने हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आज 68 चेंडूंत 39 धावा हव्या होत्या. त्याने 21 चेंडूंत 28 धावा केल्या. म्हणजे आता हाच विक्रम गाठण्यासाठी त्याला 47 चेंडूंत फक्त 11 धावा पाहिजेत. उद्याच्या सामन्यात त्या होतील म्हणा.
शुभमनने 46 धावा केल्या, पण त्या लयबद्ध नव्हत्या. अर्थात, त्याने स्टॉइनिसला मिडविकेटला फेकलेला षटकार मस्त होता. अन् त्याहून झकास होता नॅथन एलिसने त्याला उलटय़ा पंजाने टाकलेला संथ गतीचा चेंडू. एलिसने दोन संथ गतीचे चेंडू टाकले. एक शुभमनचा पार मामा बनवून गेला आणि दुसरा शिवमचा भाचा करून गेला! एलिस आणि झाम्पाने प्रत्येक सामन्यात आपल्या फलंदाजांची परीक्षा घेतली आहे. दोघंही टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आपल्या सामोरे येतील. तोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं जरुरी आहे. त्याची सुरुवात उद्याच्याच सामन्यापासून करता येईल.
उद्याच्या सामन्यासाठी सूर्याला एक मज़ेदार इल्तिज़ा. तंबूतून एवढं लांब चालत येऊन टॉससाठी उपस्थित राहण्याची तसदी स्वतः घेऊ नकोस अन् इतरांना देऊ नकोस! अभिषेक, शुभमनला सरळ पॅड बांधून मैदानावर पाठव! तू मुंबईचा. हुशार असशीलच. माझा विनोद कम चेष्टा कम मस्करी कम उपहास तुला कळला ना!



























































