ठसा – सुशीलकुमार मोदी

>> संजय मिस्त्री

बिहार राज्याचा भारतीय जनता पक्षाचा चेहराच म्हणून जर कुणाची ओळख असेल तर ते होते सुशीलकुमार मोतीलाल मोदी. सुशीलकुमार हे बिहार राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री होय. आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी बिहार राज्याचे वित्तमंत्री म्हणूनही काम केले. बिहारमधील कुप्रसिद्ध चारा घोटाळ्याचा छडा लावण्याचे काम ज्या मोजक्या लोकांनी केले त्यात सुशीलकुमार मोदी यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. सुशीलकुमार बालपणापासूनच धाडसी स्वभावाचे होते. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा 1962 चे हिंदुस्थान-चीन युद्ध झाले तेव्हा त्यांनी शाळेतच लष्करी कवायतीचे शिक्षण घेणे सुरू केले. ते बाल कमांडंट झाले. याच काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेतले. 1968 पर्यंत संघात पूर्णकालीन कार्यकर्ता, विस्तारक झाले. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्यांचा कल समाजवादी आंदोलनाकडे झुकला. घरी परंपरागत कापड विक्रीचा व्यवसाय होता. परंतु 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी तत्कालीन इंदिरा सरकार विरोधात संपूर्ण क्रांतीचा नारा दिला तेव्हा त्याला प्रतिसाद देत सुशील मोदी वयाच्या 23 व्या वर्षी चळवळीत उतरले. यामुळे त्यांना एमएससीचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. आयुष्याची तब्बल 50 वर्षे राजकारणात घालवलेल्या मोदी यांचे व्यक्तिमत्त्व तसे कुटुंबवत्सल असेच होते. आपले कुटुंब, मुले यांचे राजकारणापेक्षा त्यांना अधिक महत्त्व वाटत असे. रुक्ष राजकीय क्षेत्रात सतत वावरणाऱया सुशीलकुमार मोदींनी वयाच्या 35 व्या वर्षी प्रेमविवाह केला. हा विवाह आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि आंतरप्रांतीय होता. पत्नी जेसी जॉर्ज ही मूळ मुंबई निवासी होती. या प्रेमविवाहाला तसा त्यांच्या घरातून विरोध होता, परंतु विवाहानंतर मात्र तो मावळला. सुशील मोदी तत्त्वनिष्ठ असल्यामुळे त्यांनी ठरवले की, विवाहाला फक्त 12 वऱहाडीच असतील. त्यानुसार केवळ 12 जणांचेच वऱहाड लग्नाला गेले. राजकारणी माणूस तसा संसारात फारसा रमत नाही, पण मोदींचे तसे नव्हते. मुलांचा अभ्यास व्हावा म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्यास पक्षाला नकार कळवला होता. एवढेच नव्हे तर कुटुंबासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद नाकारले होते. त्यांचा राजकारणातील प्रवास तसा खऱया अर्थाने 1990 पासून सुरू झाला. ते पाटणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. भाजपने त्यांना पक्षाचे विधानसभा नेते बनवले. त्यानंतर 1996 ते 2004 पर्यंत ते विरोधी पक्षनेता होते. 2000 मध्ये ते नितीशबाबूंच्या अल्पकालीन सरकारमध्ये संसदीय कार्यमंत्रीही होते. लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात त्यांनी चारा घोटाळ्याची याचिका दाखल केली. 2004 मध्ये ते भागलपूर येथून लोकसभेचे खासदार झाले. 2005 मध्ये बिहारमध्ये एनडीएचे सरकार आले तेव्हा मोदींनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते बिहार विधानसभा पक्षनेते झाले. तसेच एनडीए सरकारमध्ये ते वित्तमंत्रीही झाले. 2010 च्या निवडणुकीनंतर ते बिहारचे उपमुख्यमंत्रीही झाले. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना कर्करोग झाला होता. परंतु त्यांनी आजाराला फारसे जुमानले नाही. अखेर मंगळवारी त्यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या रूपाने बिहारमधील भाजपच्या एका निष्ठावंत पर्वाचा अस्त झाला.