हिंदुस्थानची बेअब्रू झाली… पहलगाममध्ये बळी गेलेल्या पर्यटकांचा मोदींनी अपमान केला, शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा जोरदार हल्ला

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची संधी असताना मोदींनी कच खाल्ली, हिंदुस्थानची बेअब्रू झाली, सिंदूर वगैरे सर्व राजकारण आहे, पहलगाममध्ये बळी गेलेल्या 26 पर्यटकांचा मोदींनी अपमान केला, असा जोरदार हल्ला त्यांनी मोदी यांच्यावर केला.

संजय राऊत यांनी शस्त्रसंधीवरून पंतप्रधान मोदी यांना सवाल केले आहेत. पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही अशी भाषा मोदींनी केली होती, पाकिस्तानचे तुकडे करणार होते, त्याचे काय झाले? कोणत्या अटी-शर्तींवर शस्त्रसंधी केली, असे संजय राऊत म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी याचे उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंधच काय?

140 कोटी लोकांच्या हिंदुस्थानला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगतात आणि मोदी शस्त्रसंधी करतात यामागचे काय कारण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंधच काय? जर त्यांची मध्यस्थी जगात मानली जाते तर मग इस्रायलचे युद्ध का थांबवले नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली. ट्रम्प हे मोदींचे मित्र असूनही त्यांनी हिंदुस्थानला पाठिंबा दिला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान शिल्लक राहिला नसता

संजय राऊत यांनी यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण करून दिली. इंदिरा गांधींनी 1971 च्या युद्धात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांची मध्यस्थी स्वीकारली नव्हती. युद्ध टोकाला नेले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. आज त्या असत्या तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता, असे संजय राऊत म्हणाले.

मोदींनी सैन्याचे आणि देशाचे मनोबल खच्ची केले

पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्यासाठी अचानक कच खाऊन सैन्याचे आणि देशाचे मनोबल खच्ची केले. ट्रम्प यांचा हिंदुस्थानशी काय संबंध. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदीच म्हणत होते की, देशाचे पंतप्रधान ओबामांकडे जाऊन रडत आहेत. मग आता मोदी आणि अमित शहा ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मोदींनी राजीनामा द्यावा

मोदींनी पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केल्याने देशाचा अवमान झाला आहे, देशाच्या भावना दुखावल्या आहेत, देशाचा विश्वासघात केल्याबद्दल मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. मोदी 200 देश फिरले, पण हिंदुस्थानचा एकही मित्र नाही. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात हिंदुस्थानला पाठिंबा देणाऱ्या एका तरी देशाचे नाव मोदींनी सांगावे, असे आव्हान देतानाच, तटस्थ राहणे म्हणजे पाठिंबा दिला असे होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.