मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह जरांगेना भेटायला हवे! जरांगेशी चर्चेतून तोडगा काढला पाहिजे!!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. सरकार अजूनही जरांगे यांची समजूत काढू शकलेलं नाहीये, त्यामुळे मुंबईमधील परिस्थिती ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक बनण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून राज्याची सामाजिक स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. जरांगे यांच्यामुळे राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात लक्ष घातले पाहिजे. हे एका पक्षाचे काम नसून राज्यातील सर्व पक्षीयांना एकत्र घेऊन त्यांनी यासंदर्भात तोडगा शोधायला हवा.

जरांगे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी एका शिष्टमंडळाची गरज आहे. हे शिष्टमंडळ, सर्वपक्षांचे मिळून बनलेले असावे आणि यामध्ये दोन्ही सदनातील विरोधी पक्ष नेते, गटनेते, जाणकार नेते यांचा समावेश असावा. या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरांगेंना भेटायला हवे अशी मागणी राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, इतका गोंधळ या राज्यात कधीही झाला नाही. राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतात काहीततरी उपटत होते, आपण पाहिले असेल. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी जरांगे यांच्यामुळे राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात लक्ष घातले पाहिजे.

संजय राऊत यांनी या निमित्ताने भाजपवर सडकून टीका केली, ते म्हणाले की; “भाजपची दंगली घडवण्याची योजना आहे. 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना राम मंदिर हे त्यांचे शस्त्र आणि जातीय दंगली अस्त्र आहे. या देशात धार्मिक तणाव, उन्माद निर्माण करून निवडणुका लढायच्या अशी त्यांची योजना आहे. 400 पारचा आकडा हा त्याच दंगलीच्या आगीतून निर्माण झालेला नारा आहे. यांना देश चालवायचा नसून आपला पक्ष आणि सरकार चालवायचा आहे. अबकी बार 400 पार हजारो बळी घेऊन, हिंदू-मुस्लिम दंगे करून 400 पार त्यांना करायचा आहे का ? त्याची प्रात्यक्षिके देशाच्या विविध भागात सुरू आहेत.”