सत्य बोललो तर माफी कसली? संजय राऊत कडाडले

संजय राऊतांनी आयुष्यात कोणाची माफी मागितली नाही. सत्य बोललो असेल तर माफी कसली ? असे उद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काढले आहे. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. सदर प्रकरणाच्या सुनावणीसाठी राऊत हे मालेगाव न्यायालयात आले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुनावणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी भुसे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली.

विद्यमान मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले. या पैशांचा हिशोब मागितला तर आम्ही गुन्हेगार होतो. भारतीय घटनेने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिला आहे, असे राऊत यांनी मालेगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. संजय राऊतांनी आयुष्यात कोणाची माफी मागितली नाही, सत्य बोललो असेल तर माफी कसली ? उलट दादा भुसे यांनीच माफी मागायला हवी असे राऊत यांनी म्हटले. 2024 ला आमच्या सगळ्या तक्रारींची दखल घेतली जाईल आणि 2024 नंतर सगळ्या तपास यंत्रणा स्युओ मोटो दखल घेतील, आम्हाला त्यांच्याकडे जाण्याचीही वेळ येणार नाही असे राऊत म्हणाले. अद्वय हिरे यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करताना राऊत यांनी म्हटले की, “हिरे कुटुंब शिवसेनेसोबत आल्यापासून या कारवायांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. काल आम्ही प्रशांत हिरे यांना भेटलो, त्याआधी अद्वय हिरेंना भेटलो. शिवसेना हिरे कुटुंबाच्या पाठीशी आहे.”