
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कुठलाही वाटा किंवा घाटा होणार नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
नाशिक येथे रविवारी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील मी एक घटक होतो, साक्षीदार होतो. पूर्णकाळ राज्याचे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहील, अशी कमिटमेंट सुरुवातीपासूनच केलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही परवा जाहीरपणे हेच सांगितले, असे खासदार राऊत म्हणाले.
2024 ला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच सत्ता घेतील यावर ते म्हणाले की, पश्चिम बंगालचा पराभव हा भाजपचा नसून नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा आहे असे मीडिया म्हणते. तामीळनाडू, केरळमध्ये त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे 2024 चे आडाखे आताच बांधता येणार नाहीत. राजकारण हे चंचल असते. ते स्वर्गीय पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह कुणालाच आपल्या मुठीत ठेवता आले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट हा राजकीय व्यवस्थापनाचा भाग होता, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्याचा कुणी विचार करीत असेल तर हा मोर्चा दिल्लीत निघायला हवा. मराठा आरक्षणासंदर्भात अमेंडमेंट करण्याचा, घटनेमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेकडे, प्रधानमंत्र्यांचा, राष्ट्रपतींचा आहे, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आपण सगळय़ांनी एकजुटीने दिल्लीत जायला हवे.
याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, माजी आमदार वसंत गिते, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.
विरोधकांना तिसऱया लाटेची तयारी करायचीय
पंढरपूरच्या आषाढी वारीसंदर्भात सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांचे प्राण वाचावेत, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या भावनेने घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने, प्रशासनाने दुसरी लाट मोठय़ा कष्टाने आटोक्यात आणली आहे. विरोधी पक्षाला जर तिसऱया लाटेची तयारी करायची असेल तर त्यांनी भडकविण्याची कामे करावीत. विरोधी पक्ष आणि काही संघटना फूस लावून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते वारकऱयांच्या आणि राज्याच्या जनतेच्या जिवाशी खेळताहेत, असेही खासदार राऊत म्हणाले.

































































