
सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तो कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाच लुडबूड करू नये, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. त्यांच्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले आणि आंदोलक गुलाल उधळत गावी गेले. यावर अजूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हा विषय मीडियाने सुद्धा आता फार ताणू नये किंवा लांबवू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला. तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी स्वीकारला आणि ते समाधानी आहेत.
जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाच लुडबूड करू नये. स्वत: जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेले आहे की, जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो जीआर आला त्याबाबत ते समाधानी आहेत, मराठा समाजही समाधानी आहे. अशावेळेला त्याच्यामध्ये खुसपटं काढून, वाद निर्माण करून, तेढ निर्माण करून कोणाला काय मिळणार आहे? महाराष्ट्र, मुंबई शांत आहे, समाजामध्ये शांतता असून लोक पेढे अजूनही खात आहेत. सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असे राऊत म्हणाले.
मनोज जरांगे-पाटील हे त्यांच्या गावाला पोहोचले आहेत. मी काल त्यांचे वक्तव्य ऐकले. त्याच्यामध्ये उगाच ताणाताणी करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचे नुकसान होईल. ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे समाधानी दिसतोय, मराठा समाज समाधानी दिसतोय मग आपण कशाकरता त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचे. जे कुणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू नये, असेही राऊत यांनी ठणकावले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अत्यंत संयमाने हाताळला. त्यासाठी ते कौतुकास पात्र असल्याचेही राऊत म्हणाले.
फडणवीसांना ‘वर्षा’त घुसून धुतले असते, जरांगेंचे धक्कादायक विधान
एका जीआरने मागण्या पूर्ण होणार नाही, मराठी समाजाच्या मागण्या टप्प्या टप्प्याने पूर्ण कराव्या लागतील, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोण काय म्हणते याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. स्वत: मराठा समाजाचे नेते समाधानी आहेत, तर यांनी कशाकरता बोलावे. कुणीच बोलू नये. आंदोलन संपले आहे आणि सर्व शकांचे निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतले आहे. आता उपमुख्यमंत्री काय म्हणताहेत, मंत्री, इतर नेते काय बोलताहेत त्यात पडणे महाराष्ट्राच्या हिताचे वाटत नाही.
फडणवीस म्हणतात, हा सरसकट नव्हे, पुराव्यांचा जीआर, भुजबळांना समजावलं