
जगामध्ये हिंदुस्थानला मित्र नाही. मोदी 200 देश फिरून आले, पण हिंदुस्थानचा मित्र कोण हे त्यांनी सांगावे. जगभरात मिठ्या मारत फिरणाऱ्या मोदींनी ठामपणे या युद्धात हिंदुस्थानला पाठिंबा देणारा, हिंदुस्थानच्या बाजुने उभा राहिलेला देश दाखवावा. मोदी जपान, रशियाचे नाव घेतील, पण ज्या प्रमाणे चीन, तुर्कीने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तसा देश दाखवावा. तटस्थ राहणे म्हणजे पाठिंबा नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्पला मध्यस्थी घालून केंद्र सरकार कुणाला वाचवतंय? पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला? केंद्र सरकार ट्रम्प यांची मध्यस्थी स्वीकारते, मुळात ट्रम्प कोण आहेत? नुकसान हिंदुस्थानचे झाले आहे. जम्मू-कश्मीरमधील राजौरी, पूंछ सारख्या गावांचे झाले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात 20 नागरीक ठार झाले आहेत. ट्रम्प यांची मध्यस्थी जगात मान्य केली जात असेल तर त्यांनी इस्रायल आणि गाझातील युद्ध का थांबवले नाही? गाझा पट्टीमध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला बेचिराख झाले. एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले. पण मोदींचे मित्र ट्रम्प हिंदुस्थानच्या पाठी उभे राहिले नाहीत. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या पापाने हिंदुस्थानचे युद्ध का थांबवले? यामुळे देशाच्या भावना दुखावल्या आहेत. 26 महिलांचे कुंकू पुसणारे 6 दहशतवादी कुठे आहेत? जोपर्यंत या 6 दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण होणार नाही. आज त्यामुळेच लोकांना इंदिरा गांधी यांची आठवण येत आहे. 1971 साली इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून लावला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इंदिरा गांधी यांनी सांगितले होते की, आमच्यामध्ये हस्तक्षेप करणार तुम्ही कोण आहात. आम्ही एक सार्वभौम, स्वतंत्र राष्ट्र आहोत. तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही हवा तो निर्णय घ्या. तुम्ही पाकिस्तानला मदत करा किंवा काही करा. आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेले आहे आणि ते टोकाला नेणार. इदिरा गांधी यांनी युद्ध टोकाला नेले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले, अशी आठवणही राऊत यांनी सांगितली.
भाजपनेच मोदींचा राजीनामा मागावा
खरे म्हणजे नरेंद्र मोदी यांचा राजीनामा त्यांच्याच पक्षातील लोकांनी मागायला पाहिजे. मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी देशाचा विश्वासघात केला आहे. सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा यायला पाहिजे. पहलगाम येथे हल्ला करणारे 6 अतिरेकी आजही सापडलेले नाहीत. अमित शहा गृहमंत्री असताना 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मोहन भागवत राष्ट्रभक्त असतील तर त्यांनी शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल
त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची लायकी नाही
आज इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलेच नसते. इंदिरा गांधी यांनी 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केले. पाकिस्तानच्या 90 हजार सैन्याने गुडघे टेकले. आणि हे काय करत आहेत? तर नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर फक्त घाणेरड्या भाषेत टीका करत रहा. त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याचीही यांची लायकी नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.
आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे ट्रम्प यांचा संबंध काय? – संजय राऊत
वाचा सविस्तर – https://t.co/cQIjO9pPx3 pic.twitter.com/9sgWTeAoe9— Saamana Online (@SaamanaOnline) May 11, 2025