मोदींचं कालचं भाषण फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘रुदाली’ होती, संजय राऊत यांची तुफान फटकेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे संसदेतील भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचे झाले तर रुदाली होती. रुदाली, रडगाणे हे फडणवीस यांचे आवडते शब्द आहेत. मोदींचे कालचे भाषण हे रडगाणेच होते. रुदाली हा शब्द भाजपचाच असून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी तो प्रचलित केला. हा शब्द त्यांच्या गुरुच्या बाबतीत पक्का बसतोय, अशी खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी घेतला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

काल संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांनी केलेले भाषण ऐका. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांकडे अजिबात उत्तर नाही. विरोधी पक्षाने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ना संरक्षण मंत्र्यांकडे आहे, ना पंतप्रधानांकडे आहे, ना गृहमंत्र्यांकडे आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

संसदेमध्ये सत्ताधारी खोटे बोलत आहेत. 1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले आणि देशाचे गृहमंत्री सरदार पटेल यांचा 1960 सालचा किस्सा सांगत आहेत. असा हा यांचा इतिहास आहे. मुळात त्यांचा इतिहासाशी संबंधच नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहांसह भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. ‘सिंदूर’वर बोलताना मोदींनी काही दिवसांपूर्वी बिहारच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणातील मुद्देच पुन्हा मांडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सांगितले नव्हते, असे त्यांनी सांगितले खरे, पण 100 मिनिटांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले. याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला.

“महाराष्ट्रात ‘फडणवीस अ‍ॅक्ट’ लागू, समज देऊन सोडून द्यायचं अन् बाकीच्यांना…” संजय राऊतांचा घणाघात, राष्ट्रपतींची भेट घेण्याचा इशारा

मोदींनी आपल्या भाषणात प्रे. ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. चीनचे नावही घेतले नाही. पाकिस्तानला हिंदुस्थानविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीनने सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केली. पाकिस्तानने त्यांचे नेटवर्क वापरले, त्यांचा बेस वापरला, त्यांची शस्त्र-विमाने वापरली. त्या चीनचे नाव घ्यायला मोदी घाबरले. मोदी असे म्हणत होते की, माझ्यावर कुणाचा दबाव आला नाही. मी कुणाशीही चर्चा नाही. पण काल मोदींचे भाषण संपल्यावर ट्रम्प परत म्हणाले की, मी युद्ध थांबवले. प्रे. ट्रम्पचे नाव घ्यायला या सरकारची हातभर का फाटते हे कळत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ट्रम्प खोटारडे आहेत हे बोलायची तुमच्यात हिंमत आहे काय? राहुल गांधी यांचा तुफान हल्ला, संसदेत ‘सिंदूर’वरून विरोधकांनी सरकारचा धूर काढला