
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये नेहरू सेंटर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शेजारी बसलेल्या अनेक व्यक्ती देशविरोधी कृत्यात सहभागी झालेल्या आहेत. भाजप-संघाची राष्ट्रभक्ती ढोंग आणि पाखंड आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, संघाला 100 वर्ष पूर्ण होणे ही आनंदाची गोष्ट आहे. पण आम्ही पाहिला तो संघ आज राहिलेला नाही. संघाच्या कार्यक्रमाला अनेक लोक निमंत्रित केले होते. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यातल्या काही लोकांना पाहिल्यावर आम्हाला धक्का बसला. गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून चहा पितोय किंवा नाश्ता करताना आम्ही पाहिले.
सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावे किंवा ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण दिली त्यांना हे माहिती नसावे की सरसंघचालकांच्या बाजूला बसलेल्या अनेक व्यक्ती या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अदनान सामी याचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते आणि 1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी हिंदुस्थानवर बॉम्ब टाकत पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तोच अदनान सामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता. तुम्ही हिंदुस्थानला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देताय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, एक नटीही बाजूला होती आणि ती आय लव्ह भागवत म्हणाली. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लूटआऊट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावर एपस्टीनप्रमाणे लहान मुलांवर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप आहे. ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिकडे होते. कदाचित सरसंघचालकांना हे माहित नसेल की संघाचे चारित्र्य किती बिघडले आहे. हिंदुस्थानवर हल्ला करणारे पाकिस्तानी, लूकआऊट नोटीस असलेल्या नट-नट्या, बँका बुडवणाऱ्या लोकांना तुम्ही देशाला काय संदेश देताय? संघ पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतेय का?
संघामुळे भाजपला अच्छे दिन आल्याचे विधान सरसंघचालकांना या कार्यक्रमात केले. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यावी. प्रे. ट्रम्प यांच्या अटी-शर्तीवर आम्ही शरणागती पत्करली. संघाचे प्रचारक होते तेच भाजपचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे देश अमेरिकेचा गुलाम झाला त्याची जबाबदारी संघाने स्वीकारली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
सरसंघचालकांनी चारित्र्याच्या गोष्टीही केल्या. गुणवान आणि गुणवत्तेमुळे देशात परिवर्तन होईल असे सरसंघचालक म्हणाले. त्यांच्या विधानाचे स्वागत आहे, पण देशभरातील भ्रष्टाचारी, गुन्हेगार, व्याभिचारी, बलात्कारी यांना पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यामुळे देशात कोणते सामाजिक परिवर्तन होणार आहे? याविषयी सरसंघचालकांनी आम्हाला मार्गदर्शन केले असते, तर आम्ही त्यांच्या ऋणात राहिलो असतो, असा टोलाही राऊत यांनी हाणला. तसेच सावरकरांना भारतरत्न दिले, तर भारतरत्नाचा सन्मान वाढेल असेही भागवत म्हणाले. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. सरकार त्यांचेच आहे, मग वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत? संघाचे स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी, जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांना जीवाचे रान केलेले आहे, ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही, हा सवाल लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहांना थेट विचारायला हवा, असे आव्हानच राऊत यांनी दिले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही जो संघ पाहिला तो बाळासाहेब देवसर यांचा आणि रज्जू भैया यांचा. त्यांच्या पायाला चरणस्पर्श करण्याचे भाग्य आम्हाला लाभलेले आहे. सुदर्शन आम्हीही भेटलेलो आहोत, ते मातोश्रीवरही आलेले आहेत. बाळासाहेब देवसर यांना भेटण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेकदा गेलेलो आहोत. त्यामुळे आम्ही जो संघ पाहिला आणि अनुभवला तो आज दिसत नाही. तसेच या कार्यक्रमाला जावेद अख्तर यांना बोलावल्याचे दिसत नाही. ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होतेस हे बहुतेक सरसंघचालकांना माहिती नसेल. तसेच शाहरूख खानला बोलावले नाही. शाहरूख खानचे आजोबा लेफ्टनंट जनरल शाहनवाज खान हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सेनापती होते. हे सगळे त्यांच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही आहेत. पण अदनान सामी किंवा ज्या नट-नट्यांवर फसवणूक केल्याबद्दल आणि पॉर्न फिल्म बनवल्याबद्दल लूकआऊट नोटीस आहेत, हे संघ परिवाराच्या दृष्टीने राष्ट्रभक्त आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.
अनुसूचित जाती-जमातीची व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते, मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती



























































