
मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवतीर्थावर एकत्र येतील. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात करतील, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिली.
आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय, प्रेरणादायी आहे. मला तर त्या दिवसाची आठवण येते ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसाने आनंदोत्सव साजरा केला. अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसते, असेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेना-मनसे युतीमुळे धाबे दणाणलेल्यांवरही संजय राऊत यांनी टिकास्त्र सोडले. कोण काय बोलतात भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे सगळे लाचार, दिल्लीचे बुटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बुटचाट्यांनी त्यांचे राजकारण करावे. त्यांनी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू नये. दोन ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यामुळे त्यांच्या पोटात जो भीतीचा गोळा आला त्यांच्या तोंडातून बाहेर पडतोय, अशी टीका राऊत यांनी केली.
मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे लढणार आहेत. दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा होईल. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतील. pic.twitter.com/Xjr93HpQfc
— Saamana Online (@SaamanaOnline) December 24, 2025
जिथे शक्य, तिथे एकत्र
ते पुढे म्हणाले की, मराठी माणूस एक आहे आणि एक राहील. त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील. आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक, पुणे या महानगरपालिका आहेतच. इथे आमची जागा वाटपाची चर्चा संपली आहे. यासह इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे, तिथेही आम्ही एकत्र लढण्यासंदर्भात काम करत आहोत.
मराठी माणूस शिवसेना-मनसे युतीच्या मागे उभा राहील
तुमच्यासमोर लढणारेही मराठीच आहेत? असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले, हा एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानेच स्वराज्याला विरोध केला. शिवाजी महाराजांनी ज्या सव्वा दोनशे लढाया लढल्या त्यातल्या किमान 200 लढाया या स्वकियांविरुद्ध लढल्या आणि तरी त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. बाळासाहेबांना सगळ्यात जास्त विरोध काही मराठी लोकांनीच केला, तरीही त्यांच्यावर मात करून त्यांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली. हे प्रत्येक राज्यामध्ये होत असते, आपलेच लोक आपल्याविरुद्ध उभे राहतात. त्यांना स्वाभिमान नको आहे. जे दिल्लीचे बुटचाटे आहेत, त्या बुटचाट्यांनी बुटपॉलीशवाल्यांचा मेळावाही घेतला होता. चांगल्या प्रकारे दिल्लीचे बुट कसे पुसता येतील, कसे चाटता येतील याची रंगीत तालीम सुरू आहे. पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस, मध्यमवर्गीय हा ठामपणे या शिवसेना-मनसे युतीच्या मागे उभा राहील याविषयी मनात शंका नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.






























































