
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. बीजू जनता दल, अकाली दल आणि भारत राष्ट्र समितीने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा भारतीय जनता पक्षाला धक्का असल्याचे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केले.
संजय राऊत म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आहे. घटनात्मक पदासाठी असलेल्या निवडणुकीत सुद्धा भाजप किंवा मोदी-शहांना फोडाफोडी करावी लागत असेल तर हे या देशाच्या संविधानाचे दुर्दैव आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त मतं मिळावीत म्हणून तुम्ही खासदार विकत घेणार असाल तर तसे करण्याची गरज नाही. ही निवडणूक संविधानाच्या नियमानुसार व्हायला पाहिजे. पण भाजपचे जे चारित्र्य आहे, त्यानुसार त्यांना प्रत्येक निवडणुकीत पैशाचे वाटप करण्याची चटक लागली आहे.
इंडिया आघाडीची सर्व मतं ही ठाम आहेत. अर्थात काही विरोधी पक्षातील जे नेते आहेत, मग बीजेडी असेल, अकाली दल असेल, केसीआर असेल त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व पक्षांनी एनडीएला मतदान करावे म्हणून त्यांच्यावर दबाव होता. पण मोदी-शहांचे त्यांनी ऐकले नाही आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. ते इकडे किंवा तिकडे कुठेही गेले नाहीत, तटस्थ आहेत, असे राऊत म्हणाले.
हे पक्ष सातत्याने मोदी सरकारच्या बाजुने उभे राहिलेले आहेत. पण उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते एनडीएच्या उमेदवाराला मतदान करायला तयार नाहीत. हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी अशी अफवा पसरवली आहे की आम्ही मतांची फोडाफोडी करणार. पण त्याला काही अर्थ नाही. आमची मतं पक्की असून ही लढत रंगतदार होईल. मुळात तीन पक्ष तटस्थ राहिले हा भाजपला धक्का. हे पक्ष सभागृहात सातत्याने प्रत्येक विधेयकावेळी त्यांच्या बाजुने वेळी उभे राहिले. पण तेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला मतदानासाठी येणार नाहीत हा भाजपला, मोदी शहांच्या राजकारणाला धक्का आहे. भविष्यामध्ये काय होणार याचा हा अंदाज आहे, असे संजय राऊत ठामपणे म्हणाले.
एनडीएने त्यांचा उमेदवार 100 पेक्षा अधिक मतांनी निवडून येईल असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ते असेही बोलू शकतात की आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाही. आम्हाला शून्य मतं मिळणार आहेत. 100 पेक्षा जास्त मतांनी निवडून यायचे असेल तर त्यासाठी मतपेटी आहे, आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दूध का दूध पानी का पानी होईल. या क्षणी त्यांच्यात आणि आमच्यात 40 मतांची तफावत आहे हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे, त्यांच्या मित्रपक्षांसह बहुमताचा आकडा आहे, तरीही सुदर्शन रेड्डी यांना आम्ही निवडणुकीला उतरवले आहे आणि इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राजकारणात अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्या सुद्धा कुठेतरी चर्चा झाल्या असतील ना, असेही संजय राऊत म्हणाले.
उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, व्हीप नसल्यामुळे खासदार ‘राजा’, एनडीएला क्रॉस वोटिंगचा धोका
बिनडोकांना कौतुकही समजत नाही
भाजपने पितृपक्षात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतली. याबाबत संजय राऊत यांनी एक भाष्य केले होते. तसेच सामनाच्या अग्रलेखातही याचा उल्लेख केला होता. यावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना राऊत यांनी फटकारले. मी हा मुद्दा गंमतीने मांडलेला आहे. मुहूर्त, हिंदुत्व, पंचांग पाहून आतापर्यंत निवडणूक घेत होते. आता पितृपक्षात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्यूलर झाले आहेत. भाजप अंधश्रद्धा पाळत नाही म्हणून त्यांचे अभिनंदन केले आहे. अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. याचे कौतुक केले आहे. ते बिनडोक असून त्यांना कौतुकही समजत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.