
इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आम्ही शांततेचे बाजूने असल्याचे जयशंकर संसदेत बोलताना म्हणाले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ही षंढांची शांतता असल्याचा घणाघात राऊत यांनी चढवला. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, ही शांतता जर ते म्हणत असतील तर त्याला शिवसेनेच्या किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत षंढांची शांतता म्हणतात. षंढ हा शब्द असंसदीय नाही. युद्ध हिंदुस्थानच्या सीमेवर आले आहे. हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत हल्ला करून अमेरिकेने इराणचे एक जहाज बुडवले आणि 100 हून अधिक नौसैनिक मारले गेले. स्वत: मोदी युद्धाच्या दोन दिवस आधी इस्रायलला जाऊन आले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या हत्येनंतर मोदी यांनी साधा शोक व्यक्त केला नाही. अशा वेळेला तुम्ही शांततेच्या बाजुने कसे? जो इराण आपला वर्षानुवर्ष मित्र आहे, त्याचे सर्वोच्च नेते मारले जातात आणि तुम्ही शोक व्यक्त करत नाहीत याचा अर्थ तुमची शांतता ही षंढांची शांतता आहे.
एपस्टीन फाईलमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू केल्याचा आरोप अमेरिकेतूनही होत आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हिंदुस्थान गप्प असण्यामागेही तेच कारण आहे. एरवी आमचे विश्वगुरू प्रत्येक विषयावर जगाला सल्ले देत असतात. एपस्टीन फाईल हेच युद्धाचे मोठे कारण आहे आणि जेफ्री एपस्टीन हा ज्यू होता. इस्रायलने त्या माध्यमातून जगातील राजकारण्यांना, उद्योगपतींना आपल्या जाळ्यात अडकवले ही खरी स्टोरी आहे. त्याच्यामुळे एपस्टीन फाईल, त्याच्यातील गौप्यस्फोट यामुळे काही लोकांनी युद्ध पुकारले, तर काहींनी मौनात जाणे पसंत केले, अशी टीका राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात जो प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर तर चर्चा होईलच. पण सध्या हिंदुस्थान एका भयंकर संकटातून जातोय. युद्ध जरी इराण, इस्रायल, अमेरिका आणि अन्य राष्ट्रातील असले तरी त्याच्या ज्वाळा हिंदुस्थानपर्यंत पोहोचल्या आहेत. या सगळ्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका, रोजगार याची समस्या निर्माण होणार आहे. कृषी उत्पादनं ठिकठिकाणच्या बंदरावर अडकून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या जागतिक घडामोडीवर हिंदुस्थानची भूमिका काय आहे?
मध्य पूर्वेत युद्ध भडकलेले आहे आणि त्याच्यावर हिंदुस्थानची, पंतप्रधानांची भूमिका नक्की काय आहे हे समजून घ्यायचा अधिकार या देशाला आहे आणि त्याच्यावर चर्चा ही देशाच्या संसदेत व्हायला पाहिजे. त्यात विरोधी पक्षाचे चुकते असे वाटत नाही. सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर देशात चर्चाच घडू द्यायची नाही. कारण त्यांना राहुल गांधी यांची भीती आहे. राहुल गांधी यांच्याकडे हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय धोरण, हिंदुस्थान करत असलेल्या गुप्त तडजोडी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. राहुल गांधी जेव्हा बोलतात, जे प्रश्न उपस्थित करतात, जी माहिती देतात त्याच्यावर सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही तयारी नसते, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

























































