महाराष्ट्राच्या तिजोरीत दातावर मारायला कवडी नाही, हे 31 हजार कोटी कुठून आणणार? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर बोलताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ”महाराष्ट्राच्या तिजोरीत दातावर मारायला कवडी नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 31 हजार कोटी कुठून आणणार? असा सवाल संजय राऊत यांनी केली.

”प्रधानमंत्र्यांचा भार हलका करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येण्याआधी फडणवीसांनी पॅकेज घोषित केलं. फडणवीसांचं हे पॅकेज आहे धुळफेक आहे. प्रधानमंत्र्यासमोर कुणी मागणी करू नये, त्यांना काळेझेंडे दाखवू नये, शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवू नये. यासाठी केलेली ही धुळफेक आहे. पण मला असं वाटतं पंतप्रधानांनी मोठं पॅकेज जाहीर करण्यास हरकत नव्हती. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की या सरकारवर नऊ लाख कोटीचं कर्ज आहे. या 31 हजार कोटीची उभारणी तुम्ही कशी करणार? शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळणार. जर पंतप्रधानांनी घोषणा केली असती तर हे पैसे केंद्राकडून आले असते. महाराष्ट्राच्या तिजोरीत दातावर मारायला पैसे नहाती , कवडी नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी 31 हजार कोटींची घोषणा केली है पैसे आणणार कुठून? त्यामुळे याची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत देखील शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. येत्या 11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरला शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.