2024च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरेंटी – संजय राऊत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी नोकऱया देऊ असे केवळ आश्वासन दिले, पण शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार महासंघाने कोटय़वधी मराठी तरुणांना आतापर्यंत नोकऱया दिल्या आहेत, असे प्रशंसोद्गार यावेळी संजय राऊत यांनी काढले. मोदी सरकारने केवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाला बीसीसीआयमध्ये नोकरी दिली, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. तसेच 2024 च्या निवडणुकीनंतर मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरेंटी, असा ठाम दावाही संजय राऊत यांनी केला.

 

500 वर्षांनंतर नरेंद्र मोदींसारखा युगपुरुष जन्माला आला असे विधान मिंधे सरकारचे बाळराजे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते, पण या पृथ्वीतलावर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कुणीही युगपुरुष नाही, असे ठणकावून सांगतानाच संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही लक्ष्य केले. शिंदे आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील दोन कंत्राटी कामगार आहेत असे ते म्हणाले. मराठी माणूस गुलाम, वेठबिगार असू नये म्हणून लोकाधिकारचा लढा सुरू असून लोकाधिकारने आता विटभट्टीवर काम करणाऱया या दोघांसाठी आंदोलन केले पाहिजे. मराठी माणसाला दिल्लीला जाऊन शेपूट हलवायला लावतात म्हणजे काय. हा महाराष्ट्राच्या इभ्रतीचा प्रश्न आहे, अशी खिल्ली संजय राऊत यांनी उडवली.

स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकऱया मिळणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्याची जाणीव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला करून दिली. मराठी माणसासाठी काम करताना केस पांढरे झाले, पण लोकाधिकारचा कार्यकर्ता कधी फुटला नाही याचाही संजय राऊत यांनी आवर्जून उल्लेख केला.

मोदींचे राज्य हे पापाच्या पैशातून निर्माण झाले असून ते उलथवून टाकायचे आहे, असे आवाहन करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाच्या फौजेला कात्रजचा घाट दाखवला तसा शिवसेनेची मशाल भाजपला दाखवेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. संजय राऊत यांनी कवी सुरेश भट यांनी त्यांना तीन दशकांपूर्वी लिहून दिलेली एक कविताही यावेळी वाचून दाखवली. त्यावेळी लिहिलेली ही पुढील कविता सध्याच्या परिस्थितीला लागू पडतेय असे ते म्हणाले.

कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर

कुरतडते पाकळय़ास गुजराती एक ढोर

त्यांचेही सत्तेचे वेगळेच रामायण

रामाच्या नावावर रावण होतात थोर

फडफडती ते असेच दिल्लीचा चंद्र दूर

पण आजत कावकाव करती नकली चकोर

रेघोटय़ा ओढण्यास सत्तेचे पीठमळे

पण देवेंद्र गर्जतसे हा तर आमचाच जोर

तू बाबा भारतीय, तुझी लफडीही भारतीय

मी अशुद्ध, तू अशुद्ध, पूज्य तो हरामखोर

ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म

पक्षफोडी करताना बोंबलली चोर… चोर…

धोरणाविना कधी ना बोलती देशभक्त

हे असे कसे उनाड सत्य जाहले मुजोर