पुढल्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल!

2137
sanjay-raut-press-conferenc

येत्या दोन दिवसांत राज्यातील सत्तास्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. दिल्लीमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी सांगितले की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि लोकप्रिय सरकार अधिकारावर येईल.

राज्यात सध्या राष्ट्रपती शासन आहे. इथे लोकप्रिय सरकार स्थापन करण्यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रियेतून जावं लागतं. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की राज्यपालांना सत्तास्थापन करत असताना बहुमताचा आकडा पुराव्यासह द्यावा लागतो. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. पुढील 2 दिवसांत चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात एक लोकप्रिय सरकार अधिकारावर येईल आणि राज्यशकट पुढे नेईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक असून या बैठकीनंतर बैठकींना पूर्णविराम होईल असेही संजय राऊत यांनी सांगितले.

सत्तास्थापनेच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेसकडून दिरंगाई होत आहे का असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला. यावर ते म्हणाले की प्रत्येक पक्षाची काम करण्याची एक पद्धत असते. काँग्रेस पक्षात कोणताही निर्णय एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे घेतला जातो. या प्रक्रिया पूर्ण झाल्या असाव्यात असा आमचा अंदाज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या आज होणाऱ्या भेटीबाबत पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा संजय राऊत म्हणाले की ‘संसद काळात अनेक नेते पंतप्रधानांना भेटत असतात. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याबद्दल माहिती देण्यासाठी शरद पवार जर पंतप्रधानांना भेटत असतील तर त्याबद्दल तुमच्या मनात काळंबेरं येण्याची गरज नाही.’

शरद पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार भाजपसोबत जावे यासाठी दबाव टाकत असल्याच्या बातम्यांबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारला. ‘ ज्यांना महाराष्ट्रात लोकप्रिय सरकार येऊ नये, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, राज्यात राष्ट्रपती शासन रहावं, राज्य अस्थिर रहावं अशी इच्छा आहे अशांकडून या बातम्यांची फोडणी दिली जात असेल तर मग अशा बातम्यांवर राज्याच्या जनतेने विश्वास ठेवू नये’ अशा शब्दात संजय राऊत यांनी या प्रश्नाला उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या