पहिले ड्रग्जच्या रावणाला खतम करा! संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्जने खतम झालाय. नाशिकमधील पंचवटी असो, विदर्भ असो अथवा पुणे- मुंबई सगळीकडे ड्रग्जचा व्यापार सुरू असून या ड्रग्जच्या रावणाला आधी खतम करा असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. आज विजयादशमी असून आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामाने अहंकाराचे प्रतीक बनलेल्या रावणाचा वध केला होता. आज राज्यापुढे ड्रग्जची मोठी समस्या निर्माण झाली असून या ड्रग्जरुपी रावणाचा खात्मा करायलाच हवा असे राऊत यांनी म्हटले.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका गरब्याच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात घोषणा दिली होती की, ‘बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा’. यावरून राऊत यांनी टीका करताना म्हटले की, ‘त्या बच्च्यापर्यंत रावणांकडून जे ड्रग्ज पोहोचतंय त्याचा बंदोबस्त करा. बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा लेकीन ड्रग्ज लेके नही बोलेगा. पहिले ड्रग्जच्या रावणाला खतम करा.’ महाराष्ट्रातून मोठे उद्योग गुजरातला नेले आणि गुजरातहून काय येतंय तर अंमली पदार्थ. महाराष्ट्राला संपवण्याचा हा रचलेला कट आहे का ? असा सवालही राऊत यांनी यावेळी विचारला.

अहंकाराचा नाश होऊन 2024 सालच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते बसलेले असतील, हे मी खात्रीने सांगतो असे राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले, मिंध्यांच्या सभेच्या निमित्ताने लावलेल्या पोस्टरबाजीवरूनही राऊत यांनी यावेळी टीका केली. “बाटगा मोठ्याने बांग देतो, नपुंसक जास्त कांदे खातो. पोस्टरवरील चेहरा हा पोटात कळ आल्यासारखा आहे. बाळासाहेबांसोबत असे फोटो लावण्याची आमची किंवा उद्धव ठाकरेंचीही हिम्मत नाही झाली. आम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षाचे मालक नाही, आम्ही विश्वस्त आहोत. ही ड्युप्लिकेट लोकं असून हा ड्युप्लिकेट मेळावा आहे. ” असे राऊत यांनी म्हटले