
एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शहांपेक्षा आम्हाला जास्त आहे. शिंदेंचा गट खरी शिवसेना असे म्हणणे म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले यांचा आहे असे म्हणण्यासारखे आहे, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिंदे गटाचा उल्लेख खरी शिवसेना केला होता. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी शहांवर हल्ला चढवला.
अमित शहा यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते मुंबईत येतात आणि अशा प्रकारची विधान करतात. महाराष्ट्राच्या जखमेवर, मराठी माणसाची जी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ते महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या अवती भोवतीची बेइमान मराठी माणसं टाळ्या वाजतात, याचे आपल्याला दु:ख वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अमित शहा यांनी पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य करून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. मराठी एकजुटीचा, मराठी माणसाचा अपमान केला. एकनाथ शिंदे यांचा गट हा अमित शहांच्या मालकीचा आहे. आम्ही शहांचे बुटचाटे आहोत हे शिंदेंनी वारंवार सिद्ध केले आहे. त्याच्यामुळे शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर इतके करूनही शिवसेना उभी आहे हे त्याचे फस्ट्रेशन आहे. एकनाथ शिंदे यांनी काय सिद्ध केले? शिंदेंची ओळख ही लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आम्हाला कुणी बोलबच्चन म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही मोदींपासून घेतली आहे. नरेंद्र मोदी हे जगातील समस्त बोलबच्चन महामंडळ, संघटनांचे अध्यक्ष आहेत. स्वत: देवेंद्र फडणवीस ज्युनियर बोलबच्चन आहेत. त्यांना ते जमत नाही, आणि ते रोज उघडे पडतात. मोदीही रोज उघडे पडायला लागले आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. प्रे. ट्रम्प यांनी काल अठराव्या वेळा सांगितले की, हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध मी थांबवले. मोदी बोलबच्चन असले तरी त्यांची या विषयावर दातखिळी बसलेली आहे.


























































