
महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भारतीय जनता पक्ष नाही तर जनता ठरवेल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. नगरपालिका निकालानंतर महाराष्ट्रात भाजपच धुरंधर असे मथळे माध्यमांनी दिले आहेत. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
धुरंधर या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे. ते फुगवलेले, सुजवलेले काल्पनिक पात्र आहे. हे खरे पात्र नाही. रहमान डकैत हे त्यातले खरे पात्र आहे. आता भाजपला मुंबईची ल्यारी करायची असेल, तर धुरंधर सारखे, सुजवलेले पात्र हवे. पण या देशात, महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप नाही तर जनता ठरवेल. कारण ज्या पद्धतीने कालचे निकाललावले गेले, जे बिहारमध्ये झाले तेच काल नगरपालिका निवडणुकीत झाले, असे म्हणत संजय राऊत यांनी नगरपालिका निवडणुकांची तुलना बिहारच्या निकालाशी केली.
ते पुढे म्हणाले की, तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या. बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आणि भाजप चौथ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे ईव्हीएमवर संशय येणारच. महाराष्ट्रात विधानसभेचे आकडे आहेत, तेच नगरपालिकेत आले. 122 भाजप, 54 शिंदे गट आणि 40-42 अजित पवार गटाला, हेच आकडे विधानसभेत आले. त्यामुळे त्याच सेटिंग केलेल्या मशीन वापरल्या गेल्या का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावे असे काही लोकांना सतत वाटते. भाजपला वाटते मिंध्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी, मिंध्यांना वाटते अजित पवारांकडे भाऊबंदकी व्हावी आणि भाजपला वाटते संपूर्ण देशामध्ये भाऊबंदकी व्हावी आणि आम्ही राज्य करावे. फोडा, झोडा आणि राज्य करा ही भाजपची निती आहे. या सगळ्यातून बाहेर येत आम्ही प्रितीसंगमाचा प्रयोग करत आहोत, त्यामुळे त्यांच्या पोटात दुखते. नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेगळी आहे. ही संवेदनशील, भावनात्मक आमि मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे, असे संजय राऊत मनसे सोबतच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
भाजपचे आमदार पराग शहा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो. तो चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल, पण भाजपचे सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडते. नियमबाह्य पद्धतीने अदानीला अख्खी मुंबई दिली. पराग शहा जाऊन अदानीची कॉलर पकडणार आहेत का किंवा देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार आहेत का? तुम्ही नियमबाह्य पद्धतीने मुंबईतल्या जमिनी, मिठागार, धारावीचे भूखंड कसे दिसे, महापालिकेने नियम मोडून एफएसआय संदर्भातील निर्मय नियमबाह्य पद्धतीने अदानीच्या सोयीचे कसे घेतले? या संदर्भात पराग शहासारखे जे राजकारणातले नवीन गुंड निर्माण झाले आहेत हे प्रश्न विचारतील का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल! – संजय राऊत
महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद असू नये आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आपण लढावे असे आवाहन आम्ही काँग्रेसला केले आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्र लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहेत. आता त्यांची काही गणितं असतील. अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकेत यश मिळाले. पण मुंबईचे राजकारण वेगळे आहे. आम्ही वारंवार आवाहन करतो, की आपण एकत्र लढले पाहिजे. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर मतभेद बाजुला ठेऊन आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.



























































