शिवतीर्थावर शिवसेना-मनसेची सभा होऊ नये यासाठी सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या महायुतीच्या मुंगळ्यांचा रडीचा डाव सुरू! – संजय राऊत

शिवसेना-मनसे युतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची जय्यत तयारी केली असून प्रचारात ठाकरे बंधूंच्या धडाकेबाज सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा संयुक्त सभा घेणार आहेत. मुंबईतील शिवतीर्थावरही शिवसेना-मनसेची सभा होणार आहे. मात्र तिथे सभा होऊ नये यासाठी सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या मुंगळ्यांचा रडीचा डाव सुरू असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते.

महायुतीने 12 जानेवारीला शिवतीर्थावर सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही 11 जानेवारीसाठी शिवाजी पार्कचे मैदान मागितले होते. पण जसा बिनविरोधचा घोटाळा सुरू आहे, तसेच हे… शेवटी ज्याच्या हाती सत्ता तो पारधी. पालिका प्रशाशन, नगरविकास त्यांच्या हातामध्ये आहे. आमच्या लोकांनी 11 आणि 12 तारखेसाठी शिवतीर्थाची मागणी केली आहे.

आम्हाला 11 किंवा 12 तारखेला सभेची परवानगी मिळू शकते. त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. आमची सभा शिवतीर्थावर होऊ नये यासाठी रडीचा डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी तारखांचा घोळही केला आहे. त्याच्या हातात सरकार आहे. पण मुंबईत सभा होईल. आमची मुंबई एवढी मोठी आहे. ही मुंबई काय महायुतीच्या बापजाद्यांची, उपाऱ्यांची, भ्रष्टाचाऱ्यांची आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.

मुंबईवर गेल्या 60 वर्षापासून ठाकरेंचेच राज्य आहे. एवढी मोठी मुंबई आहे, पण शिवतीर्थाला एक महत्त्व आहे. त्यामुळेच सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या महायुतीच्या मुंगळ्यांचा प्रयत्न आणि डावपेच सुरू आहे की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल, असे राऊत म्हणाले.

सभा आणि शाखाभेटी

दरम्यान, आज शिवसेना भवनामध्ये शिवसना-मनसे-राष्ट्रवादीच्या वचननाम्याचे प्रकाशन होईल. राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत. शशिकांत शिंदे उपस्थित असणार असून ते पत्रकारांशी संवाद साधतील. तत्पूर्वी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक शाखांना भेटी दिल्या. सभांबरोबर शाखा-शाखांना भेटी द्याव्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करावा हा त्यामागील उद्देश. शाखाभेटी या छोट्या सभाच असतात, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही ठरवले आहे की सभा आणि दौऱ्यातून जसा वेळ मिळेल, त्यानुसार मुंबईतील शाखांना भेटी द्यायच्या, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

नील सोमय्या विरुद्ध दिनेश जाधव

मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 च्या जागेचा आग्रह आणि हट्ट राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. आमच्याकडे चांगला उमेदवार आहे, सगळे मिळून जिंकू असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे नाईलाजाने ती जागा त्यांच्याकडे दिली. आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागे उभे राहायचे ठरवले, पण नेहमीप्रमाणे बिनविरोधचा घोटाळा झाला. मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध… बिनविरोध म्हणत नाचत असले तरी तसे नाही. आमचे तिकडचे कडवट शिवसैनिक पदाधिकारी दिनेश जाधव यांनी काहीतरी गडबड होऊ शकते वाटल्याने अर्ज भरून ठेवला होता आणि त्यांचा अर्ज कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अधिकृतपणे पत्र काढत दिनेश जाधव शिवसेना पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. तिथे नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. त्यांना मशाल चिन्हा मिळू शकले नाही, त्यांचे चिन्ह दुरदर्शन संच आहे. पण लढाई कांटे की होणार आहे. मुंबई माझी म्हणणारे महाराष्ट्रद्वेष्ट्याविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांना विजयी करतील यात शंका नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.