
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार इस्रायल-अमेरिकेच्या हातची कठपुतली झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या होते, जो प्रदीर्घ काळापासून देशाचे नेतृत्व करतोय आणि तो देश परंपरेने हिंदुस्थानचा मित्र आहे. तरी पंतप्रधान शोक व्यक्त करू शकत नाहीत. त्यांना कुणी ब्लॅकमेल करतेय का? कुणाकडे कुठली फाईल आहे का? अशी चर्चा जगभरात सुरू असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या होते तेव्हा त्याबद्दल शोक व्यक्त करणे हा एक शिष्टाचार असून तो पाळणे गरजेचे आहे. युद्ध काळात देशाचे पंतप्रधान नेतन्याहूंना फोन करतात, जॉर्डनच्या राजाला फोन करतात, तसेच सौदी, कुवैत, दुबईच्या प्रिन्सला फोन करतात. पण ज्या देशावर सगळ्यात मोठे संकट आहे, ज्या देशावर हल्ला झालेला आहे, ज्या देशाचे सर्वोच्च नेते हल्ल्यात मारले गेलेत त्यांना सुद्धा फोन करणे किंवा शोक संवेदना व्यक्त करणे याला आम्ही शिष्टाचार म्हणतो. इतर देशांना काय वाटेल म्हणून शोक संवेदना व्यक्त करायच्या नाहीत, हे चुकीचे आहे. हा एक शिष्टाचार सुद्धा आपण पाळत नसू तर आपले परराष्ट्र धोरण माती खातेय एवढेच सांगावे लागेल, असे राऊत म्हणाले.
पंडीत नेहरूंपासून जे तटस्थतेचे आंतरराष्ट्रीय धोरण होते ते मातीमोल झाले आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी अमेरिका-इस्रायलच्या हातची कुठपुतली झालेली आहे हे स्पष्ट दिसतेय. असे काय कारण आहे की, पंतप्रधान इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा शोक व्यक्त करू शकत नाहीत? कुणी त्यांना ब्लॅकमेल करतंय का? कुणाकडे कुठली फाईल आहे का? अशा चर्चा जगभरात सुरू आहे. आपण जगात अनेक शत्रूराष्ट्रांच्या नेत्यांच्या हत्येबाबत शोक व्यक्त केलेला आहे. पाकिस्तान, चीनच्या नेत्यांच्या मृत्यूवरही शोक व्यक्त केलेला आहे. हा एक शिष्टाचार आहे, असे राऊत म्हणाले.
युद्धावर हिंदुस्थान कोणतीही भूमिका घेत नसल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने अनेक वर्ष या देशावर राज्य केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला अजूनही तितकेच महत्त्व आहे. कदाचित ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त आहे. या युद्धा संदर्भात हिंदुस्थानने भूमिका मांडणे आवश्यक आहे. एका राष्ट्रप्रमुखाची हत्या होते आणि हिंदुस्थानकडून साधी शोक संवेदना व्यक्त केली जात नाही.
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील, संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल! – संजय राऊत
अमेरिकेने इराणविरुद्ध जे युद्ध पुकारलेले आहे, त्याचा हेतूच एपस्टीन फाईलवरची चर्चा बंद व्हावी हा आहे. एपस्टीन फाईलमध्ये ट्रम्प यांच्यासह जगभरातील अनेक बड्या नेत्यांची नावे आली. हिंदुस्थान, इस्रायलच्या काही प्रमुख लोकांची नावेही त्यात असून यावरील चर्चा थांबावी, लोकांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून काही राष्ट्रप्रमुखांनी, पंतप्रधानांनी एकत्र येऊन हा इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाचा डाव रचला का अशी आता यायला लागली आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, हे युद्ध चार ते पाच आठवडे चालेल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र राऊत यांनी हे युद्ध त्यापेक्षा जास्त चालेल असे म्हटले. अमेरिका किंवा रशियाला अफगाणिस्तानविरुद्ध शेवटपर्यंत युद्ध करता आले नाही. त्यांना तिथून गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेला व्हिएतनाममधूनही पळ काढावा लागला. अफगाणिस्तानमधून पळावे लागले. इराण या सर्वांपेक्षा झुंझार राष्ट्र आहे. आता कदाचित ट्रम्प यांना वाटत असेल की आपण चुकलो. कुणाच्या तरी सल्ल्यावरून हा हल्ला केला. पण यात सगळ्यात जास्त नुकसान इस्रायलचे आणि अमेरिकेचे नुकसान होताना दिसत आहे, असेही राऊत म्हणाले.

























































