लहान पक्षांना संपवायचे, मोठ्यांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक! 

लहान पक्ष संपवण्याची किंवा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सामिल करून घेण्याची भाषा करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. लहान पक्षांना संपवायचे, मोठ्या पक्षांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मोदी-शहांचा भाजप व त्यांची बावनकुळेंसारखी पिल्लावळ लोकशाही, संविधान मानायला तयार नाही. बावनकुळे जे बोलले तेच काही वर्षांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बोलले होते. देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील तो म्हणजे भाजप. इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू ही त्यांची भाषा होती. पण आज ते आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. अनेक लहान-लहान पक्षांना बरोबर घेऊन पुन्हा एनडीएची उभारणी करावी लागत आहे. अर्थात कोणी कितीही म्हणाले याला संपवू, त्याला संपवू तरी ते शक्य नाही. देशात लोकशाही आहे.

लहान पक्ष संपवा म्हणणाऱ्या बावनकुळे यांनी 2024 नंतर त्यांचा पक्ष राहतोय का हे बघावे. मुळात त्यांचा पक्ष भाजप राहिला नसून पूर्णपणे काँग्रेसमय झालेला आहे. भाजपमध्ये आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेलेल्यांनी ठरवले तर एका रात्रीत भाजप संपून जाईल. त्यांच्या 303 खासदारांपैकी फक्त 110 खासदार मूळ भाजपचे आहेत. बाकी सर्व काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत. या सर्व खासदारांनी किंवा आमदारांनी भाजप सोडायचा निर्णय घेतला, तर हा देशच भाजपमुक्त होईल हे बावनकुळेंना माहिती नसावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

आजही भाजपला त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील प्रमुख लोकांची गरज लागते. याला संपवू त्याला संपवू म्हणाऱ्यांचा पक्षच परावलंबी आहे. लहान पक्षाला संपवण्याची भूमिका हुकुमशाहीला पुढे नेणारी आहे. देशातून लोकशाही संपवायची, हुकुमशाहीविरोधात जे पक्ष उभे राहतील मग ते लहान असो किंवा मोठे त्यांना संपवायचे, फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक आहे. या देशातून लोकशाही पूर्णपणे नष्ट करायची, लिहिण्याचे, बोलण्याचे, निवडणुका लढण्याचे स्वातंत्र्य नष्ट करायचे ही बावनकुळे बोलतात त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. ही अटलबिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण आडवाणी यांच्या नाही तर मोदी-शहांच्या भाजपची विचारसरणी आहे. याविरोधात आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. 2024च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवते, आणि कोण कोणाला लोकशाही मार्गाने गाडते हे कळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्हाला महाविकास आघाडीचा घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतले. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकात ते सामिल होतात. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होतात. 27 फेब्रुवारीलाही महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीने येण्याचे मान्य केले आहे. बैठकीत जागावाटपाची चर्चा होईल. पण त्यांची जी भूमिका आहे की तीन पक्षांनी जागावाटप करावी आणि त्यांच्याकडून आम्ही हव्या त्या जागा मागून घेऊ अशा प्रकारचे जागावाटत जगाच्या इतिहासात कधी होत नाही, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही सगळे संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करतोय. मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, देशात संविधान रहावे, लोकशाही टिकावी यासाठी ज्यांचे एकमेकांशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची आहे. आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही. कारण संविधान वाचवणे ही आमच्याइतकीच त्यांचीही जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेचे, लोकशाहीचे रक्षण करणे आणि मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा पराभव करणे हे आमच्याइतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे, असेही राऊत म्हणाले.