
नव्या संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेत स्मोकबॉम्बचा हल्ला करण्यात आल्याने अवघा देश हादरला आहे. याचा मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडे कोणत्याही प्रकारची ठोस आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था नाही. सरकार फक्त प्रचार आणि सभा घेण्यात मग्न असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.
दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी संसद भवनामध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारावर भाष्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला. कालच्या घटनेमुळे म्यानमारचे अतिरेकी मणिपूरमध्ये कसे घुसले हे जनतेला कळाले असेल. कारण सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची ठोस आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था नाही. सरकार भावनिक राजकारणाच्या पलिकडे जात नाही. संसदेमध्ये असा प्रकारे काही तरुण घुसले, त्यांनी गॅलरीतून खाली उड्या मारल्या, स्मोकबॉम्ब बाहेर आणि आत फोडले, हाहाकार माजला, खासदारांनी पकडले. हे सर्व ठीक आहे, मात्र कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही कुठे घुसू शकते ही या देशाची स्थिती आहे. कारगिलही असेच घडले होते, संसदेवरील 22 वर्षांपूर्वीचा हल्लाही असाच घडला आणि आजही तसेच घडलेले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, या तरुणांचा मार्ग चुकला, पण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या संपूर्ण देशाच्या आहेत. महागाई, बेरोजगारी, अस्थिरता याविषयी अस्वस्थता आहे. यातील एक तरुण महाराष्ट्रातील लातूरचा, तर एक तरुणी हरिणायाची आहे. ही मुलं बेरोजगार आहेत. ग्रॅज्युएट होऊनही त्यांना पकोडे तळायला जागा नाही. ती व्यवस्थाही मोदी सरकारने ठेवलेली नाही. त्यातील एक मुलगी पीएचडी करत असून अजित पवारांनी तिला मार्गदर्शन केले पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
वैफल्यग्रस्त होऊन तरुण अशा मार्गाने निघाले असतील तर ही अराजकाची सुरुवात आहे. देशातील तरुण या मार्गाने जात असेल तर… त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आणि आमच्या दृष्टीने अतिरेक आहे. हा चुकीचा मार्ग आहे. सरकारची दोन कोटी रोजगार देण्याची योजना फेल झाली आहे. देशातील सुशिक्षित, बेरोजगार, वैफल्यग्रस्त तरुणांना दिशा देण्याचे काम गरजेचे आहे. तरुणांच्या भावनेचा उद्रेग देशासाठी घातक आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी आमचे कोणालाही समर्थन नसून संसदेमध्ये घुसून अशा प्रकारे हल्ला करणे याचे समर्थन कोणी करणार नाही हे देखील स्पष्ट केले.
देशात बेरोजगारी, महागाई, घुसखोरी, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोदी सरकार तीन राज्यात जिंकले असले तरी हे प्रश्न कायम आहेत. याचा अर्थ या तिन्ही राज्यातील निवडणुका महागाई, बेरोजगारी या विषयावर न लढता भलत्याच मार्गाने लढवल्या गेल्या. रामलल्लाचे दर्शन मोफत घडवू हा बेरोजगारी, महागाई, घुसखोरी या प्रश्नावर उपाय असेलतर अशा प्रकारचा उद्रेग देशात जागोजागी होऊ शकतो, असा इशाराही राऊत यांनी दिला.
दरम्यान, नवीन संसद अधिक असुरक्षित वाढत असल्याचे राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. जुन्या संसदेमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत होती. पण इथे आम्हाला सारखे वाटते की काहीही होऊ शकते. सगळ्याच बाबतीत इथे अक्षरश: गोंधळ आहे. मुळात हे संसद भवन वाटत नाही. संसद भवन ही ऐतिहासिक, देशाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा असलेली वास्तू आहे. तिथे येताना तसा फिल यावा लागतो, पण इथे तसेच वाटत नाही. जुन्या संसद भवनातून चालताना वाटायचं की माझ्याबरोबर देशाचा इतिहास चालतोय, वावरतोय. पण इथे तसे वाटच नाही, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली.


























































