मी येणार म्हणून अस्वस्थ होते! संजय राऊत यांचा मिंध्यांना टोला

पत्रकार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाण्याची इच्छा होती, पण मी येणार म्हणून मुख्यमंत्री भलतेच अस्वस्थ झाले. त्या पत्रकार परिषदेवर निर्बंध आणले. पत्रकारांना फोटो लावून पास देण्यात आले. एवढी भीती का वाटते तुम्हाला, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना संजय राऊत यांनी खरंच मी आलो आणि मानगुटीवर बसलो तर? या जाणिवेनेच मुख्यमंत्र्यांना चलबिचल झाल्याचा टोला लगावला. त्यामुळे पत्रकार परिषदेवर निर्बंध आणल्याचे मी ऐकले. एवढेच नाहीतर आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला कधी फोटो लावून पत्रकारांना पास देण्याचे ऐकण्यात आले नाही. एवढेच नाही तर मी ‘सामना’ कार्यालयात असताना बाहेर साध्या वेशातील पोलिसांची पाळतही ठेवण्यात आली. मला काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी फोन केले. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही फोन आले. परंतु, हा विषय आता संपला, असे राऊत म्हणाले.

अमित शहांचे स्वागत करणार होतो…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरात आलो होतो. आम्ही त्यांचे स्वागत करणार होतो, परंतु त्यांना हे कळले आणि त्यांनी दौराच गुंडाळला. आमची भूमिका तीव्र होती. त्यामुळे त्यांनी संघर्ष टाळला अन् आमची स्वागताची तयारी वाया गेली, असे संजय राऊत म्हणाले.

कश्मिरातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचे सुचले नाही

मंत्रिमंडळ बैठकीमुळे छत्रपती संभाजीनगरात लोकांचे काय हाल झाले, हे मी डोळ्यांनी पाहिले. खोक्यांमुळे आमदार कसे वाया गेले, हेदेखील बघितले. लोकांचा सरकारवर रोष आहे. क्रांतीचौकात आम्ही कश्मिरात शहीद झालेल्या चार जवानांना श्रद्धांजली वाहिली. पण, सरकारला या शहिदांसाठी चार अश्रू ढाळावेत असे वाटले नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

गोदी मीडियावर बहिष्कार

इंडिया आघाडीने वृत्तवाहिन्यांच्या 14 पत्रकारांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा बहिष्कार गोदी मीडियावर असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पत्रकारांना भूमिका असली पाहिजे, पण गेल्या दहा वर्षांत हे पत्रकार एकाच नेत्याचा अजेंडा चालवत आहेत आणि प्रश्न मात्र विरोधकांना विचारतात. त्यामुळे बहिष्काराच्या निर्णयात काही चूक आहे असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

मराठवाड्याला फक्त घोषणा मिळाल्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर वारेमाप खर्च करण्यात आला. पण, या बैठकीतून मराठवाड्याच्या पदरी काय पडले तर फक्त घोषणा. २०१६ मध्ये ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आता 59 हजार कोटींचे पॅकेज आहे. अडीच वर्षे तुम्ही काय केले असे विचारतात, त्या सरकारमध्ये हेच मंत्री होते. त्यांच्याकडे सगळी महत्त्वाची खाती होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधोगतीला हे मिंधेच जबाबदार असल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले.