
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचा एक खासदार राज्यसभेवर जाणार आहे.
कांग्रेसने महाराष्ट्रातील राज्य सभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे!
महाविकास आघाडी एक आहे एकत्र राहील!
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2026
राज्यसभेतील त्या एका जागेबाबत शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी राज्यसभेच्या या जागेबाबत मोठं विधान केलं आहे. ”कांग्रेसने महाराष्ट्रातील राज्य सभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे! महाविकास आघाडी एक आहे एकत्र राहील! जय महाराष्ट्र!”, असे ट्विट करत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
महायुतीला 6, मविआला 1 जागा
राज्यसभेच्या सात जागांसाठी 2020 मध्ये निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर मविआने चार जागा जिंकल्या होत्या. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून उपलब्ध संख्याबळ पाहता, महायुतीच्या वाटय़ाला 6 जागा येतील. आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
























































