डॉ. संजय दीनानाथ सावंत

58

>> दुर्गेश आखाडे

कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वी केलेली अनेक संशोधने गाजली आहेत. या संशोधनाला जोड भेटणार आहे ती नव्या कुलगुरूंच्या निवडीची. कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ज्येष्ठ संशोधक डॉ. संजय दीनानाथ सावंत यांची नियुक्ती झाली आहे. कोकणच्या सुपुत्राला कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान मिळाला होता. डॉ. संजय दीनानाथ सावंत यांचे सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली हे मूळ गाव आहे. त्यांनी 1978 मध्ये कोकण कृषी विद्यापीठातून बीएस्सी पदवी प्राप्त केली. राहुरी विद्यापीठातून एमएस्सी पदवीनंतर उत्तराखंडमधील पंतनगर येथील गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर अध्यापनाबरोबरच ते संशोधनातही कार्यरत राहिले. 1986 साली ते भारतीय कृषी संशोधन केंद्र येथे संशोधक म्हणून रुजू झाले. त्यानंतर 2013 मध्ये ते पुणे येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक होते. या केंद्रात त्यांनी दीर्घकाळ संशोधन केले. द्राक्षांवरील बुरशीमुळे द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत होते. त्रस्त झालेल्या बागायतदारांना डॉ. सावंत यांच्या संशोधनामुळे दिलासा मिळाला. डॉ. सावंत यांनी केलेल्या विविध संशोधनांचा शेतकऱयांना फायदा झाला. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये एस. ए. दाभोळकर प्रयोग परिवार पुरस्कार, अभिनव गौरव, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा द्राक्ष संशोधन व विस्तार या उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले होते. 2002 मध्ये अभिनव द्राक्ष संघाचा अभिनव पुरस्कार, क्रिस्टल नॅशनल ऍग्री 2014, अपेडा एक्स्पोर्ट ऍवॉर्ड, बेस्ट रिसर्च पेपर ऍवॉर्ड 2016 ला एस. ए. दाभोळकर पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर आहेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोकणच्या सुपुत्राची निवड झाली. यापूर्वी डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि विजय मेहता या कोकणच्या सुपुत्रांनी हे पद भूषविले.

आपली प्रतिक्रिया द्या