Sanjay Singh Bail: ‘आप’चे नेते संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात जामिनाला विरोध न केल्याने न्यायालयाने सिंह यांचा जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना काही अटीशर्थी घालून जामीन दिला आहे.

संजय सिंह यांना देण्यात आलेली सूट सर्व प्रकरणांमध्ये उदाहरण म्हणून लागू करता येणार नाही, असे सांगत न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने सहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले संजय सिंह यांना सोडण्याचा आदेश दिला आहे. संजय सिंह यांना जामीन दिला जात असेल तर आपला त्याला काही आक्षेप नाही, असे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने सिंह यांना जामीन मंजूर केला. संजय सिंह यांनी या प्रकरणाबाबत मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य करू नये. मात्र, जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालयाने ठरवाव्यात, असे जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. संजय सिंह सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर करोलबाग येथील बीएलके रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी आणि मुले रुग्णालयात आहेत. संजय सिंह यांची आईही सकाळी त्यांना भेटायला आली आहे.

दिल्ली सरकारच्या मंत्री आणि ‘आप’च्या नेत्या अतिशी यांनी दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात संजय सिंह यांना जामीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिल्लीच्या मंत्र्यांनी जामिनाची बातमी शेअर करत ‘एक्स’या सोशल मीडिया साईटवर ‘सत्यमेव जयते’ असे लिहीले आहे. तर ”आज सत्याचा विजय झाला आहे. भाजपने ईडीचा वापर केल्याचे आज सिद्ध झाले आहे. भाजपकडे आमच्याविरोधात काही पुरावे नाहीत” अशी प्रतिक्रिया ‘आप’चे आमदार सोमनाथ भारती यांनी दिली.

दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात संजय सिंह यांना ईडीने गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. यापूर्वी ‘आप’ नेते संजय सिंह यांनीही दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता.