खाऊगल्ली – खमंग, चटकदार अन् झणझणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीव साबडे

खरी मिसळ कोणती? कोल्हापूरची, पुण्याची, नाशिकची यावर चर्चा झडतात. अशा वेळी नगर आणि ठाणेवाले आमचीच मिसळ अस्सल, असा दावा करतात. मुंबईतही आता अनेक ठिकाणी मटकीची अस्सल मिसळ मिळू लागली आहे. चांगली मिसळ मिळणाऱया अशा काही ठिकाणांची ही सैर.

आताच्या पिढीला कदाचित माहिती नसेल की, पूर्वी अन्नधान्य फक्त रेशनवरच मिळायचं. टंचाईचा काळ होता. रेशनवरचं धान्य बऱयाचदा निकृष्ट असायचं. त्यात कचरा असायचा. बाहेर काळा बाजार, तेव्हा विकत घेणं अवघड. त्यातही व्यापारी चांगल्या धान्यात कमी दर्जाचं धान्य मिसळत असे. अन्नधान्य, दूध, मिठाई, तूप, तेल…साऱयात भेसळ असे. त्यामुळे शाहीर आत्माराम पाटील यांनी लिहिलेलं ‘मिसळ झाली मुंबई रं दादा’ हे गाणं खूप गाजलं व लोकप्रिय झालं होतं. तेव्हा मिसळपाव किंवा नुसती मिसळ हा प्रकार आजच्या इतका लोकप्रिय नव्हता. तिथं अन्नधान्यात मिसळ, भेसळ होत असे आणि आता उसळीत फरसाण आणि अन्य अनेक पदार्थ घालून मुद्दाम मिसळ करतात.

खरी मिसळ कोणती? कोल्हापूरची, पुण्याची, नाशिकची यावर चर्चा झडतात. अशा वेळी नगर आणि ठाणेवाले आमचीच मिसळ अस्सल, असा दावा करतात. मुंबईत पूर्वी वाटाण्याच्या उसळीवर फरसाण घालून देत. तो प्रकार आता बंद झाला आणि अनेक ठिकाणी मटकीची उसळ असलेली अस्सल मिसळ मिळू लागली आहे. चांगली मिसळ मिळणारी अनेक ठिकाणं मुंबईत आली आहेत. मटकीच्या उसळीवर शेव, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाची फोड… झाली मिसळ. काही त्यात फोडणीचे पोहे व बटाटय़ाची भाजी घालतात. हे झालं अतिरिक्त. वरवर पाहता हा प्रकार खूपच सोपा व साधा, पण यात उसळ आणि तिचा रस्सा वा तर्री यांची चव सर्वात महत्त्वाची. ती जमायला हवी. ती झणझणीत व खमंग हवी. केवळ तिखटजाळ नको. तर्रीवर तेलाचा तवंग जास्त असला की घसा खवखवतो. त्यावर जाड व बारीक दोन्ही शेव प्रमाणातच हवी. शेवेच्या भाजीसाठी जी लाल तिखट शेव असते, ती शक्यतो नको. कांदा व कोथिंबीर खरोखर बारीक चिरलेली हवी. तसं नसेल तर कांदा व शेव दातात अडकते. थोडक्यात काय, तर हे सारं जमून यायला हवं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उसळीत घालायचा वाटलेला व तयार मसाला यांचं प्रमाण चुकता कामा नये. ज्यांना हे जमतं, तिथे मिसळ खाण्यासाठी हमखास गर्दी होणार. अशा काही ठिकाणांची ही सैर.

बोरीबंदरच्या आराममध्ये दोन प्रकारच्या मिसळी मिळतात. एक साधी, दुसरी झणझणीत. म्हणजे त्याचा रस्सा वा तर्री खूप तिखट. त्यांच्या मिसळीत पोहे व बटाटा भाजीही दिसते. तिथे मागितली तरच रस्सा वा तर्री मिळते. एरवीही ते देण्याची पद्धत नाही. गिरगावातील विनय हेल्थ होमची मिसळ मस्त खमंग. ती खाण्यासाठी अनेक ठिकाणांहून खवय्ये मंडळी तिथे जातात. लालबागपाशी लाडू सम्राटची मिसळ गिरणगावच्या संस्कृतीनुसार खमंग. करी रोडच्या पुलाजवळील जयहिंद रेस्टॉरंटची मिसळ एकदम भारी. वर्षानुवर्षे खमंग नि चवदार. दादरच्या शिवाजी पार्कवरील प्रकाशची मिसळ सात्त्विक, तर आस्वादची काहीशी झणझणीत आणि खमंग. शिवाजी मंदिरपाशी हाऊस ऑफ मिसळमध्ये गेलात तर मिसळीचे असंख्य प्रकार मिळतील. कोल्हापुरी, पुणेरी, नाशिकची, मुंबईची यापासून पेरीपेरी, तंदुरी, मेक्सिकन, चीज, जैन, मन्चुरिअन मिसळ, पाणीपुरी मिसळ, उपवास मिसळ आणि पुणे-नाशिक-कोल्हापूर अशा कॉम्बो मिसळीचं मोठं ताट मिळतं. मेक्सिकन, मन्चुरिअन, पेरीपेरी मिसळ हे तर फारच झालं. वैद्य रोडवर मार्तंड मिसळ आणि रानडे रोडवरील वऱहाडी मिसळ ही नावंही सध्या चर्चेत आहेत. वांद्रे पूर्वच्या अमेय रेस्टॉरंटची मिसळ चविष्ट, पोटाला त्रास न देणारी. विलेपार्ले पूर्वेला मिसळ खाण्याची अनेक ठिकाणं आहेत. नौपाडा भागात परेश टेस्टी मिसळ, मी मराठी मिसळ, मार्तंड मिसळ, हनुमान रोडवर मामाची मिसळ… अशी अनेक ठिकाणं मराठमोळ्या ठाण्यात आहेत. सांपूझ पूर्वेला वाकोल्यापाशी मिसळ कट्टा नावाचं छोटं ठिकाण आहे. आरामात बसायला जागा नाही, पण ठसकेबाज मिसळ तिथे मिळते. अंधेरीच्या सात बंगल्याशी नाना नानी पार्कजवळ असलेली थोरातांची मिसळ लोकप्रिय झाली आहे.

गोरेगावात पूर्वेला नम्रतामधील मिसळ मस्त असायची, पण ते आता बंद झालं, पण पश्चिमेला आरे रोडवर असलेल्या सप्रे यांची मिसळ चव टिकवून आहे. तिथे असंख्य व मस्त मराठी खाद्यपदार्थ मिळतात. पश्चिमेलाच महात्मा गांधी रोडवर हाऊस ऑफ मिसळमध्ये असंख्य व्हरायटी आहेत, पण तिथे बऱयाचदा पांढऱया वाटाण्याची उसळ असते. मालाडच्या मामलेदार वाडीत मिस्टर डी मिसळ आहे, तर पूर्वेला माहेश्वरी उद्यानाजवळ कोल्हापुरी मिसळ नावाचं ठिकाणं आहे. बोरिवलीच्या चिकूवाडीतील एनीटाइम मिसळ आणि पूर्वेला दत्तपाडा रोडवर पुणेरी मिसळ ही ठिकाणं खास. आता मुंबईत व अनेक ठिकाणी वडा मिसळ, समोसा मिसळ, तंदूर मिसळ, चायनीज मिसळ हे प्रकार आलेत. मिसळ ताट म्हणजे जेवणच. त्यात मिसळ पावखेरीज ताक वा मठ्ठा, ओली व कोरडी चटणी, शेजारी एखादा पापड व वडा आणि काही ठिकाणी शेवटी खाण्यासाठी एखादा गोड प्रकार देतात, पण आपण जातो ते केवळ मिसळ खाण्यासाठी. त्यावर दही एकवेळ समजू शकतो. पण त्यावर चीज, पनीरचे तुकडे, काकडी व टोमॅटोचं ड्रेसिंग हे भयंकरच. मुंबई परिसरात मिसळ म्हणताच अनेकांना आठवण येते ठाण्यातील मामलेदार कार्यालयातील मिसळीची. पोटाची आग होते, पण त्यावर लोक काय ताव मारतात, आणखी रस्सा मागतात. त्यांनी आमंत्रण नावाचं रेस्टॉरंट सुरू केलंय. तिथे सुसह्य मिसळ मिळते. मल्हार सिनेमासमोर काही वर्षांपूर्वी सुरुची सुरू झालं. ती मिसळही बेस्ट आहे. डोंबिवलीची स्टेशनजवळची मुनमून म्हणजेच आजीची मिसळ, तब्बल 51 वर्षे लोकप्रिय असलेली आणि तर्रीत तेलाचे तवंग नसलेली. पूर्व भागात गोविंदाश्रमची मिसळ तसंच शिवमंदिर मार्गावरील जय भवानी मिसळ मुंबईच्या तुलनेत खूप स्वस्त आणि मस्त. कल्याणमधील फेमस मिसळ पाव सेंटर, भटाची मिसळ, केरकर मिसळ ही तीन ठिकाणं खासच. कल्याणमध्ये मामलेदार मिसळही आली आहे. वडापावप्रमाणेच मिसळपाव हाही प्रकार अस्सल मराठमोळा. त्यामुळे मिसळ कधीही उडपी, पंजाबी, गुजराती रेस्टॉरंटमध्ये मिळत असली तरी खाऊ नये.
राज्याच्या विविध भागांत मिळणाऱया उत्तम मिसळीविषयी पुन्हा कधीतरी. कोल्हापूरची उद्यमनगरीतील फडतरे मिसळ, बावडा मिसळ, दसरा चौकातील दत्त कॅफेची मिसळ, पुण्याची काटा किर्रर् व बेडेकर मिसळ, तिरंगा मिसळ, श्रीमंत मिसळ, जुन्या रस्त्याने पुण्याला जाताना वडगावच्या अलीकडे शिंदे बंधू यांची प्रांजळ मिसळ, नाशिकची साधना चुलीवरची, श्यामसुंदर, अण्णामामाची अशा सर्वच मिसळींचा आस्वाद घ्यायला हवा. नगरची मारुतीराव मिसळ, रसरंग मिसळ, बोरुडे मिसळ खायलाच हवी. मुंबईकरांनी तिथे या मिसळी अवश्य खाव्यात आणि तिथल्या मंडळींनी मुंबई परिसरातील मिसळींचीही चव चाखावी.

[email protected]