
>> संजीव साबडे
गोल काळी टेबलं, त्यावर काच, काचेखाली मेन्यू कार्ड आणि खुर्चीही टेबलाला मॅच करणारी. एक चहा घेऊन कितीही वेळ बसा, कोणीही तुम्हाला “उठा” असं न सांगणारी इराणी रेस्टॉरंट. चहा, ब्रेड, बन, ब्रून मस्का याबरोबरच व्हेज व नॉनव्हेज पफ, समोसा, पॅटिस, मटन व चिकन कटलेट, सोबत चिकन फरचा, पात्रानी मच्छी, अंडा मसाला आणि सर्वांवर कडी म्हणजे इराण्याकडील बेरी पुलाव. अशा साऱया आगळ्यावेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांचा खजिना म्हणजे इराणी रेस्टॉरंट.
आरामात चहा प्यायचा असेल तर जावं इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये. मित्रांसह खूप वेळ गप्पा मारायचं तर योग्य ठिकाण म्हणजे इराणीच. तिथे चहाबरोबर केक मागितला की, वेटर एका प्लेटमध्ये चार-पाच केक पेस्ट्रीज आणून ठेवतो. बिस्कीट वा खारी मागितली तरी चार -पाचचीच प्लेट येणार. आपल्याला टेन्शन, याचं किती बिल येणार! पण तो वेटर सांगतो, साब जितना खाओगे, उसका ही बिल आएगा. चहाबरोबर बन मस्का किंवा ब्रून (कडक पाव) मस्का मागा, तो प्लास्टिकच्या प्लेटमध्ये ठेवतो तो वेटर. काही जण मस्का लावलेले ब्रेडचे स्लाईस मागवतात तेव्हा काऊंटरवरचा म्हातारा इराणी मालक चष्म्यातून प्रेमानं पाहतो. कारण तो ब्रेड तिथंच बनलेला असतो. त्याचा त्याला अभिमान असतो.
शक्यतो गोल काळी टेबलं, त्यावर काच, काचेखाली मेन्यू कार्ड आणि खुर्चीही टेबलाला मॅच करणारी. एक चहा घेऊन कितीही वेळ बसा, कोणीही तुम्हाला “उठा” असं सांगत नाही. उडप्याच्या हॉटेलप्रमाणे इथं कोणीही आपण खात असताना इतर लोक आपल्या उठण्याची वाट पाहत मागे उभं राहत नाही. मित्रांबरोबर तास-दीड तास गप्पा मारणारे फक्त इराण्याच्या रेस्टॉरंटमध्येच दिसतात. म्हातारा मालक मधूनच रागानं पाहतो, पण काही बोलत मात्र नाही. आपल्या शेजारच्या टेबलावर कोणी पारशी खात असतो. तो उठतो आणि बिल न देता सरळ बाहेर पडतो, पण त्याला कधीच अडवलं जात नाही. कारण तो तिथला पैसे न देता खाणारा रोजचा कस्टमर असतो. हल्ली फारशा राजकीय, सामाजिक चळवळी होत नाहीत. पूर्वी अशा चळवळीतील आणि खिशात जास्त पैसे नसलेले कार्यकर्ते तिथं चहा पीत, सिगारेट ओढत बसून असत. बन मस्काऐवजी आणखी दोन सिगारेटी हे गणित.
प्रेमिकांचंही इराणी हॉटेल हेच आवडीचं ठिकाण. विशेषत दुपारच्या नीरव शांततेत. एक कप चहा आणि तासन्तास हळुवार, कोणाला ऐकू जाणार नाहीत, अशा प्रकारे गप्पा. मध्येच हाताला हात लागला वा लावला की, ही लाजून मान खाली घालणार. मग तो मध्येच तिच्या केसांची कपाळावर आलेली बट आपल्या हातानं मागे सारणार. सारं वातावरण एकदम रोमँटिक. पूर्वी तर इराणी हॉटेलात फॅमिली रूम नावाच्या केबिन असायच्या. काही ठिकाणी फॅमिलीसाठी पोटमाळा. एकटय़ा पुरुषाला तिथं जाण्याची परवानगीच नाही. अर्थात आताही चार-पाच ठिकाणी अशी व्यवस्था आहे! कवी व चित्रकार नितीन दादरावाला यांनी कॉलेजात असताना कोणा मैत्रिणीला उद्देशून जी कविता लिहिली, त्यात तेथील चहाचा दर आता कमी झालाय गं, तू असायला हवी होतीस, अशी भावना व्यक्त केली होती. इराणी रेस्टॉरंटची अशी जी वेगळी संस्कृती आजही टिकून आहे, ती उडप्याकडे दिसणार नाही.
इराण्याकडील सारेच प्रकार वेगळे, उडप्याकडे न मिळणारे. चहा, ब्रेड, बन, ब्रून मस्का याबरोबरच व्हेज व नॉनव्हेज पफ, समोसा, पॅटिस, मटन व चिकन कटलेट, सँडविचेस, डबलडेकर ऑम्लेट पाव ही कायमच इराणी रेस्टॉरंटची खासीयत राहिली आहे. इथला खिमा व खिमा घोटाला, खिम्मा सल्ली हे प्रकार एकदम मस्त. व्हेज व चिकन, मटन धनसाक… इथला प्रत्येक खाद्यपदार्थ अतिशय ताजा असतो. प्रत्येक टेबलावर सॉसची बाटली असतेच. चिकन फरचा, पात्रानी मच्छी, अंडा मसाला आणि सर्वांवर कडी म्हणजे इराण्याकडील बेरी पुलाव, पण शाकाहारी पुलाव आणि धनसाक दाल हे कॉम्बिनेशनही मस्त. स्मोक्ड चिकन, व्हेज व नॉनव्हेज पॅटियो अशा साऱया आगळ्यावेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांचा खजिना म्हणजे इराणी रेस्टॉरंट.
इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये बेकरीही हमखास असते. पाव, केक, पेस्ट्रीज, बिस्किटं, खारी, टोस्ट, बटर हे सारं त्या बेकरीतच बनवलं जातं. ती बेकरी रेस्टॉरंटचाच भाग असते. इराण्याच्या पावांचे आणि बिस्किटांचे प्रकारही अफलातून. तिथं साधा पाव नेहमी गरमच मिळतो. अनेकदा सकाळी ब्रेड बनवणं सुरू असतं. ब्रेडच्या लादीचे स्लाईस ज्या मशीनमध्ये बनतात, ते कटर मशीन फोर्टच्या याझदानीमध्ये डोळ्यात भरतं. वाईन बिस्कीट, खोबरं असलेली, आत जॅम असलेली बिस्किटं, काही गोड, काही खारी बिस्किटं, काही बटर खारी बिस्किटं, फ्रूट बिस्किटं, स्ट्रॉबेरी बिस्किटं, विविध कुकीज, मोठे वा छोटे केक, कप केक, रवा केक, नाना खटाई असं सारं हे इराणी आपल्या रेस्टॉरंटमधील बेकरीतच बनवतात. ती इतकी मस्त की, तिथून बिल देऊन बाहेर पडताना हे बेकरी पदार्थ वा किमान पॅटिस, समोसे, कटलेट वा बिर्याणी घरी नेण्याची तीव्र इच्छा होते. इराणी रेस्टॉरंटमध्ये निम्मे लोक तरी पार्सल नेतातच. बटाटा वेफर्सही खावेत ते इराण्याकडचेच.
एकेकाळी मुंबईत इराणी रेस्टॉरंटची संख्या तीन आकडय़ांत होती, ती आता 100 च्या खाली आली आहे. धोबी तलावजवळचा ‘बस्तानी’ बंद झाला, पण समोरचा ‘कयानी’ पाय रोवून उभा आहे. तिथं जवळ एक ‘ससानियान’ आहे आणि आणखी एक आहे ग्रँट रोडला. फोर्टमध्ये ‘कॅफे मिलिटरी’, ‘ब्रिटानिया’, ‘याझदानी बेकरी’, ‘कॅफे एक्सेलसिअर’ (‘एक्सेलसिअर’ सिनेमाच्या समोर ), ‘आयडियल कॉर्नर’, ‘जिमी बॉय’ आहे. कुलाब्याला ‘पॅरेडाईज’ आहे. माटुंग्याला ‘कूलर अँड कंपनी’ आहे. टिळक पुलावरून खोदादाद सर्कलकडे येताना हिंदू कॉलनीच्या नाक्यावर ‘कॅफे कॉलनी’ आहे. माहीमला लेडी जमशेदजी रोडवर ‘कॅफे इराणी चाय’ हे अलीकडेच सुरू झालं आहे. पूर्वी डॉ. आंबेडकर रोडवर ‘मॉडर्न टाइम्स’ आणि ‘तुफान मेल’ असे दोन इराणी होते, ते आता दिसत नाहीत. ग्रँट रोड स्टेशनच्या पूर्वेला असलेलं ‘मेरवान’ बंद होता होता टिकून राहिलं.
अंधेरीला स्वामी विवेकानंद मार्गावर ‘मेरवान’ नावाची दोन रेस्टॉरंट आहेत. एकात फक्त स्नॅक्स, तर दुसऱयात केक्स. तिथून समोरच्या बाजूला ‘अहुरा’ बेकरी वर्षानुवर्षे बेकरी पदार्थ विकत आहे. अंधेरी स्टेशनसमोर दोन
‘मॅकडोनाल्ड’ आहेत. तिथं पूर्वी दोन इराणी रेस्टॉरंट होती. याखेरीज पोदार कॉलेजशेजारचं ‘कॅफे गुलशन’ आहे. कुलाब्याचं ‘लिओपोल्ड’ आणि ‘पिकाडिली’, महात्मा फुले मंडईजवळचं ‘गुलशन-एöइराण’ही माहीत असतीलच. कांदिवली पूर्वेलाही ‘इराणी कॅफे’ नावाचं रेस्टॉरंट आहे.
पूर्वी मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्ये मिळून 350 च्या आसपास यांची रेस्टॉरंट होती. पुण्यातलं ‘गुडलक’ सर्वांना माहीत आहे, पण कॅम्पमध्येही काही आहेत. हैदराबादलाही बरीच आहेत, पण आता सर्व मिळून ती बहुधा 50 असतील. पुढच्या पिढीतील लोकांना या धंद्यात रस नाही. प्रिन्सेस स्ट्रीट व भवन्स (गिरगाव चौपाटीपाशी) असलेली रेस्टॉरंट त्यांच्या मालकांनी थेट बार चालवण्यासाठी दिलीत. असे बदल होतच असतात, पण ती बंद होण्याआधी इराणी खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची संधी सोडू नये.