
पंढरपूरात विठुमाऊलीचे दर्शन घेत परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या शेगाव निवासी संत गजानन महाराजांची पालखी रविवारी वरूणराजाच्या साक्षीने जालना शहरात दाखल झाली. कोरोना महामारी आणि निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षापासून पालखी निघाली नव्हती. तब्बल दोन वर्षानंतर पालखीचे शहरात आगमन झाल्याने जालनेकरांनी श्रींच्या पालखीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. यावेळी भाविकांनीही देहभान विसरत ‘ गण गण गणात बोते’चा गजर करत भरपावसात श्रीचे मनोभावे दर्शन घेतले. पालखीचा रविवार आणि उद्या सोमवारी दोन दिवस शहरात विसावा राहणार आहे.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालखीतील वारकऱ्यांना फराळाचे तसेच चहापानाचे वाटप करून सेवाकार्य केले. शेगावचे संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या वारीवर असते. 53 वर्षाची परंपरा लाभलेल्या या पालखीची सर्वच ठिकाणी मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. कोरोनामुळे दोन वर्ष पालखीत खंड पडला होता. हत्ती, घोडे या पालखीचे प्रमुख वैशिष्ट आहे. परंतू आता हत्ती आणला जात नाही. घोड्यांचे नृत्य डोळ्याचे पारणे फेडतात. तीन अश्व, दहा वाहने व सातशे पायदळ वारकऱ्यांसह पालखीचे रविवारी शहरात आगमन झाले.
उपविभागीय अधिकारी तथा नगर पालिकेचे प्रशासक डॉ. संदीपान सानप, मंडळ अधिकारी विश्वासराव भोरे, पालिकेचे कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभागप्रमुख पंडीत पवार, अरूण वानखेडे आदींनी प्रशासनाच्यावतीने पूजा करून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीसोबत आरोग्य पथकही असते, त्यामुळे पालखीत सहभागी वारकरी मोठ्या उत्साहाने नामाचा गजर करीत पायी चालत असतात. श्रींची पालखी अंबडमार्गे शहरात दाखल झाली आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले असून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 53 वे वर्ष होते. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे पालखी पायी निघाली नव्हती. मात्र यंदा शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने शेगावहून पालखी वारकरी भाविकांसोबत निघाली. जिल्हा प्रशासनानेही पालखीचे मोठया आनंदाने स्वागत केले आहे. शहरात आगमन झाल्यानंतर जागोजागी पालखीची पूजा करून भाविकांनी पालखीचे स्वागत केले. रविवारी शहरातील सरस्वती भूवन प्रशालेत येथे संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम होता. उद्या सोमवारी नवीन जालन्यात पालखी येणार असून जेईएस महाविद्यालयात पालखीचा दूसरा मुक्काम राहणार आहे. तालुका व कदिम जालना पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पालखीचे आगमन होणार म्हणून भाविक श्री च्या दर्शनासाठी लक्ष्मीकांतनगरापासून इंदेवाडी ते जालना शहरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मनोभावे दर्शन घेत होते.



























































