भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार

माझा भाऊ संतोष देशमुख याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ज्या प्रकारे त्याची हत्या झाली ते पाहून आजही अंगावर काटा येतो. जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण चप्पल घालणार नाही, असा निर्धार संतोष देशमुख यांची बहिण प्रियंका चौधरी यांनी पंढरीत व्यक्त केला.

श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी सरपंच संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांचे कुटुंबीय पंढरीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना चौधरी यांनी, माझ्या भावाची 9 डिसेंबरला हत्या झाली होती. तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे. आज मला चप्पल न घातल्यामुळे खूप त्रास होत आहे, मग संतोषला किती यातना झाल्या असतील, अशी आठवण काढून त्या रडू लागल्या होत्या. म्हणून मी विठुरायाला साकडे घातले आहे की माझ्या भावाला न्याय मिळू दे. यामुळे त्याची मुले किमान चांगले शिक्षण घेतील. सरकारवर आमचा विश्वास आहे. परंतु संतोषला न्याय मिळाल्याशिवाय मी चप्पल घालणार नसल्याचा निर्धार केला असल्याचे प्रियंका चौधरी यांनी सांगितले.