धूम्रपानबंदी कायदा कागदावरच

>>संतोष पवार<<

तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. हा कायदा अस्तित्वात आला असला तरी त्याची ठोस अशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. कायदा कडक असला तरी अंमलबजावणी करणाऱ्यांचीच मानसिकता कमकुवत असल्याचे चित्र मुंबई शहरात दिसून येत आहे. त्यामुळे दोष कुणाचा, कायद्याचा की कायदा हाताळणाऱ्यांचा हा खरा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले. या दहा वर्षांत किती नागरिकांवर कारवाई करण्यात आली हा खरा संशोधनाचा विषय आहे; परंतु दहा वर्षांचा कालावधी संपला तरी मुंबई शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे. हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. शहरातील बसथांबे, शासकीय-निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी अनेकजण खुलेआमपणे बिडी, सिगारेट पिताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जनसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर यामुळे या परिसरात नियमित व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या आरोग्याला धूम्रपानाचे नाहक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कायद्यानुसार १८ वर्षांच्या खालील मुलाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे, परंतु पानटपरीवर बसून लहान मुले सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा दुकानांतून त्या मुलांचे समवयस्क मुले त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ सहज मिळवितात. त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करतात. मुंबई शहरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठय़ा प्रमाणात असून त्यामुळे अनेकांना तोंडाचे आजारसुद्धा बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्यांच्या दाराला लागूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने थाटात उभे आहेत. कार्यालयीन कर्मचारी खुलेआम सदर दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करून सेवन करीत आहेत. खुलेआम अशा पदार्थांची विक्री होत असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे याला काय म्हणायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. ‘मी करतो मारल्यासारखे, तुम्ही करा रडल्यासारखे’ अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.