सारथी बंद होणार नाही, स्वायत्तता कायम, तात्काळ आठ कोटींचा निधी वितरीत

835

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. सारथीचे व्हिजन 2020-30 हा पुढील दहा वर्षांचा आराखडा तयार करण्यात येईल. त्याचबरोबर ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. बैठकीनंतर अवघ्या दोनच तासांत सारथीला आठ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला.

सारथी संस्थेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सारथीच्या अस्तित्वाबाबतही तर्कवितर्क लावले जात होते. खासदार संभाजीराजे आणि इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याबरोबरच विरोधकांकडूनही वक्तव्ये करण्यात आली होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात बैठक बोलावून सर्व प्रश्न निकाली काढले. बैठकीनंतर संयुक्त पत्रकारपरिषद घेउन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे यांनी निर्णयांची माहिती दिली.

समाजातील आर्थिक दुर्बल घटक, तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत यासाठी 2020 ते 2030 अशा पुढच्या दहा वर्षांसाठी मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. सरकारकडे पैसे न मागता संस्था येत्या चार वर्षांत स्वयंपूर्ण झाली पाहिजे असा आपला प्रयत्न असणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवारांकडे
‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागाच्या अंतर्गत काम करतील. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले. या दोन्ही संस्थांची जबाबदारी आता नियोजनमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही निर्णयाचे स्वागत केले.

खासदार संभाजीराजेंच्या स्थानावरून गोंधळ; बसण्याच्या जागेपेक्षा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे – संभाजीराजे सुरूवातीला बैठक परिषद सभागृहात घेण्यात आली. तिथे सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार होते. फिजिकल डिस्टन्सिंगसाठी मंचावर फक्त तीनच खूर्च्या होत्या. बैठकीला उपस्थित काही प्रतिनिधींनी खासदार संभाजीराजेंना पुढे बसवा अशी मागणी केली. त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला. मात्र स्वतः संभाजीराजेंनी समजूतदारपणाची भूमिका घेत माझ्या बसण्याचा मुददा महत्वाचा नाही तर समाजाचे प्रश्न सुटणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

सारथीची नाहक बदनामी थांबवा
‘सारथी’चा कारभार पुढच्या काळात अधिक पारदर्शक व नियमानुसारंच होईल. संस्थेचा खर्च दरमहा वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं, त्यांचा गौरव वाढवणारा असेल, याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असून संस्थेची नाहक बदनामी थांबवावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

आपली प्रतिक्रिया द्या