
सातारा लोकसभा पोटनिवडणूक किंवा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढायचे, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार असल्याचे सूतोवाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठांशी चर्चा झाली असून कार्यकर्त्यांच्याही भावना समजून घेतल्या आहेत. आता सदसद विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार आहे. असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या ब्लॉक कमिटीच्या मेळाव्यामध्ये कराड येथे केला.
उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर तीन महिन्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, मात्र सातारा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नव्हता, तो नुकताच जाहीर झाला आहे. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. याच दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवावी असा सर्वांनीच आग्रह धरला होता. यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला भेटीला बोलावले होते.
कराड दक्षिणमधील काँग्रेसच्या ब्लॉक कमिटीचा मेळावा पूर्वनियोजित असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाला दिल्लीहून आल्यानंतर काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सदर मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवावी असा आग्रह पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे धरला होता. कार्यकर्त्यांचा आग्रह पाहता व काँग्रेसच्या वरिष्ठांशी झालेली चर्चा यामुळे पृथ्वीराज चव्हाण कोणत्याही एका निर्णयापर्यंत येऊ शकले नाहीत. यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उदयनराजेंच्या समोर कोण उमेदवार येणार ? हा सस्पेन्स कायम राहिला आहे.
दरम्यान, सातारा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच पोटनिवडणूक लढवणार असे विधान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केल्याने आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसते.



























































