सातारा जिल्हा काँग्रेस अंतर्गत बंडाळी

1576

सातारा जिल्ह्यात काँग्रेस अंतर्गत मोठ्या प्रमाणात बंडाळी व गटबाजी उफाळून आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खास मर्जीतील आमदार आनंदराव पाटील यांनी धक्कातंत्र अवलंबले आहे. आनंदराव पाटील हे जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून त्यांचे पक्षांतर्गत गोची केली जात आहे. याविरोधात आमदार आनंदराव पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.

विजयनगर (ता.कराड) येथे 13 सप्टेंबरला सातारा जिल्हयातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असुन कार्यकर्त्यांची मते आजमावून पुढील निर्णय घेण्यात येईल असा इशारा आमदार आनंदराव पाटील यांनी दिला आहे. पक्षांतर्गत होणारा घडामोडी आणि कराड तालुक्यात सुरू असणारे कुरघोडीचे राजकारण या घटना पृथ्वीराजबाबांच्या कानावर घातल्या आहेत. मात्र त्यांनी यात लक्ष घातले नाही. म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना वार्‍यावर न सोडता त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील वाटचाल ठरविणार आहे. असे आमदार आनंदराव पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आमदार आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली आहे. यावेळी आनंदराव पाटील यांच्यासमवेत त्यांचे पुतणे सुनील पाटील होते. कराड दक्षिण मतदार संघात व सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 13 रोजी विजयनगर येथील मेळाव्यात आमदार आनंदराव पाटील यांची भूमिका स्पष्ट होईल.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, माझ्या व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. ज्यांच्याजवळ काहीच नव्हते त्यांना मी काँग्रेसचे सभासद करून मोठे केले तेच मला रोखण्याचा प्रयत्न करू लागले आहे. आजवर गप्प राहिलो. पृथ्वीराजबाबांच्या अनेकदा कानावर घालून पाहिले त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी बाबांच्या जवळ असल्याने बाबांना तोटा होईल, असे वातावरण तयार करून जाणीवपूर्वक मला बाबांपासून दूर ठेवण्याची कृत्य काहीजण करत आहेत. मला मानणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून पुढील वाटचालीची दिशा ठरवणार असल्याचे आमदार आनंदराव पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या