
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांचे आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यासह दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणा भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही नाव येत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रविवारी या संदर्भात ट्विट केले आहे. जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? असा उद्विग्न सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, महाराष्ट्रातील साताऱ्यात बलात्कार आणि छळाला कंटाळून डॉ. संपदा मुंडे यांनी केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला हादरवून सोडणारी आहे. दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याची आकांक्षा बाळगणारी एक होतकरू डॉक्टर मुलगी, भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील गुन्हेगारांच्या छळाची शिकार ठरली.
ज्यांच्यावर जनतेचे गुन्हेगारांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी होती, त्याच व्यक्तीने या निष्पाप मुलीविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर बलात्कार आणि शोषण केले. अहवालानुसार, भाजपशी संबंधित काही बड्या धेंडांनी तिच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. सत्तेचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारी विचारधारेचे घृणास्पद उदाहरण असून ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? डॉ. संपदा यांच्या मृत्युनेभाजप सरकारच्या अमानवी आणि असंवेदनशील चेहऱ्याचा बुरखा फाडला आहे, असे म्हणत न्यायाच्या या लढ्यात आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. देशातील प्रत्येक मुलीसाठी, आता भीती नाही, न्याय हवा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्र के सतारा में बलात्कार और उत्पीड़न से तंग आकर डॉ. संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को झकझोर देने वाली त्रासदी है।
एक होनहार डॉक्टर बेटी, जो दूसरों का दर्द मिटाने की आकांक्षा रखती थी, भ्रष्ट सत्ता और तंत्र में बैठे अपराधियों की प्रताड़ना का शिकार…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2025

























































