
खटाव तालुक्याच्या दक्षिणेला असलेला येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. आहे. 1158 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेला येरळवाडी प्रकल्प भरल्याने निम्म्या तालुक्यावरील टंचाईचे सावट कमी होणार आहे. प्रकल्पावर अवलंबून असणाऱया सिंचन आणि प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनाही सुरळीत चालणार असल्याने शेतकरी आणि जनतेला दिलासा मिळाला आहे.
खटाव तालुक्यातील बहुतांश मंडलांत आठवडेभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चालू वर्षी सुरुवातीपासून ऑगस्ट संपेपर्यंत कमी पाऊस झाल्याने खटाव तालुक्यात ऐन पावसाळ्यातच टंचाईचे सावट निर्माण झाले होते. खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात तालुक्याच्या उत्तर भागात झालेल्या दमदार पावसाने येरळा नदी यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहे. येरळा नदीला पाणी आल्याने येरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठय़ातही वाढ होऊन सर्वांत मोठा येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला. प्रकल्पात सध्या 100 टक्के म्हणजेच 1.58 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण साठय़ापैकी 0.70 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी मध्यम प्रकल्पावर वडूज नगरपंचायतीसह आठ प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरण पूर्ण भरल्याने या नळ पाणीपुरवठा योजना सुरळीत चालणार आहेत. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडता येणार आहे.
दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरण भरल्याने तालुक्यावरील टंचाईचे सावट कमी होणार आहे. गेल्या वर्षी धरण भरायला डिसेंबर महिना उजाडला होता. वातावरणातील बदल व कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या वर्षी धरण भरले. चालूवर्षी मात्र वरूणराजाने खटाव तालुक्यावर आपली मेहेरनजर ठेवल्याने सप्टेंबरमध्येच धरण भरले आहे. त्यामुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या प्रश्न मिटला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणातून विसर्ग सुरू असल्याने येरळा नदीतून येरळवाडी धरणात पाण्याची आवक यापुढेही सुरूच राहणार आहे.



























































