अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा दोन महिन्यात छडा; 25 लाखांसाठी केला गुन्हा

1555

साताऱ्यातील आष्टा येथील तेजस विजय जाधव (वय 17) याचे दोन महिन्यांपूर्वी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करून तीन जणांना अटक केली आहे. मुलाचे अपहरण झाल्यानंतर त्याचे वडील विजय जाधव यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करत आशिष बन्सी साळुंखे (वय 29, रा. नागठाणे, ता. जि. सातारा), साहिल रुस्तुम शिकलगार (वय 25,रा. नागठाणे, ता. जि. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय 30,रा. मोळाचा ओढा, सातारा) यांना अटक केली आहे.

सर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून त्यांना अपहरण झालेल्या मुलाचा व आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने घटना स्थळाला भेट देऊन अपहरण झालेल्या मुलाची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यात नागठाणे गावातील संशयित तरुणांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. प्रकरणातील संशयित तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तपास भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या बनाव रचत वेगवेगळ्या लोकांनी त्याला नेले आहे, अशी माहिती दिली. तपास पथकाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनेचे विश्लेषण करत त्यांने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली. त्यानंतर संशियाताने दिलेली माहिती चुकीचे असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा त्यांनी स्वतः केल्याचे मान्य केले.

मुलाच्या वडिलांनी नागठाणे गावचे हद्दीतील हायवेजवळची जमीन विकली असून त्यातून त्यांना भरपूर पैसे मिळाल्याची माहिती आरोपीला होती. त्यामुळे त्यांच्या मुलाचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाख रुपये खंडणी मागण्याची योजना आरोपींनी आखली. गुन्हा करण्याच्या एक महिना आधीपासून त्यांनी योजना तयार केली होती. त्याप्रमाणे 11 डिसेंबर 2019 रोजी दत्तजयंतीच्या दिवशी अष्टे गावातील पाण्याच्या टाकीजवळ ओळखीचा फायदा घेऊन गोड बोलून त्यांनी मुलाला मोटार सायकलवर बसवून सोनापूर रोडलगतचे जांभळगाव मालावरील बाळू नाना साळुंखे यांच्या विहिरीजवळ नेले. आधी ठरल्याप्रमाणे त्यांनी दोरीने मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह सिमेंटच्या पाइपला बांधून विहिरीत फेकला. त्यानंतर गावात मुलाचे अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांनी लगेचच खंडणीची रक्कम न मागता दीड महिन्याने मृताच्या वडिलांना 25 लाख रुपये खंडणीची मागणी केली. पोलिसांनी तपासाची चर्के वेगाने फिरवत स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने 19 फेब्रुवारी 2020 रोजी एका आरोपीला बोरगाव पोलीस ठाणेचे ताब्यात दिले. इतर आरोपींना शुक्रवारी गुन्ह्याची सत्यता पडताळून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गावातील ओळखीच्या आरोपीनी 25 लाख रुपयांसाठी तेजस विजय जाधव याचे अपहरण करून खून करून त्याचा मृतदेह विहिरीमध्ये टाकला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तेजस्वी सातपुते, धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नितीन गोगावले, मुनिर मुल्ला, निलेश काटकर, अजित कर्णे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या